तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेने नुकतेच 17 वर्ष पूर्ण केली. अलीकडेच या कार्यक्रमाचे सेलिब्रेशनही दणक्यात पार पडले. गेल्या 17 वर्षात या मालिकेच्या इतिहासात अनेक चढ उतार पाहिले आहेत. या सेलिब्रेशनसोबतच सध्या चर्चेत आहे ते जेनीफर मिस्त्रीचे नाव. तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेत रोशनकौर या व्यक्तिरेखेत दिसणारी जेनीफर मिस्त्री हिने नीला टेलेफिल्म्सवर केलेले आरोप प्रकाश झोतात आले होते. त्यानंतर दोन वर्षांनी जेनीफरने पुन्हा एका मुलाखतीमध्ये या सगळया प्रकरणात तिला झालेल्या मनस्तापाचा पाढा वाचला होता. (Latest Enrtertainment News)
जेनिफरने निर्माते असित कुमार मोदी, प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्यावर मानसिक त्रास आणि लैंगिक छळाचे आरोप केले होते. याबाबत अधिक बोलताना जेनिफर सांगते, 2019 मध्ये सिंगापूर मध्ये शूटिंग करत असताना असित मोदीनी माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या ट्रीपमध्ये अनेकदा माझी रूममेट माझ्यासोबत नसायची. अशावेळी असित मला नेहमी म्हणायचे एकटी काय करतेस रूममध्ये माझ्या रूममध्ये ये आपण एकत्र व्हिस्की पिऊ. यावर मी सर्द झाले. मला भीती वाटू लागली.
त्यानंतर एकेदिवशी ते मला म्हणाले तुझे ओठ खूप छान आहेत. मला कीस करू वाटत आहे. मला काही सुचेना. त्यानंतर पुन्हा एकेदिवशी म्हणले तू हॉट दिसते आहेस. त्यानंतर मी ही गोष्ट मंदार (आत्माराम भिडे) आणि गुरूला (गुरुचरण सिंग सोढी) यांना सांगितली. पण त्यांनी त्यावर काहीच अॅक्शन घेतली नाही. विशेष म्हणजे या ट्रीपमध्ये असितसोबत त्याचा मुलगा पण होता. तरीही त्यांच्या खोड्या सुरूच होत्या. हे सगळे मी शेवटी मूनमून (बबीता) ला सांगितले. यानंतर ती त्यांच्यावर भडकली. असित मोदी पूर्ण टीममध्ये केवळ मूनमूनला घाबरायचे.
याशिवाय अनेकदा सुट्टी दिवशी मला अनेकदा शूटसाठी बोलावले जायचे. काम सोडणार असल्यास पाच महिन्याचे पैसे देणार नाही अशी धमकी मला प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणीने दिली होती.’
जेनिफर म्हणते या छळाची तक्रार करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. माझी तक्रारच नोंदवून घेतली जात नव्हती. मी जवळपास धमकीवजा इशारा दिल्यानंतर माझी तक्रार घेण्यात आली. मी त्यांच्यावर अत्यंत रागात ओरडत होते आणि ते माझ्यासमोर निशब्द उभे होते. जुलै 2023 पर्यंत मी जवळपास 60 -70 वेळा पोलिस स्टेशनला हेलपाटे मारले होते.
मी मुलीच्यावेळी गरोदर होते तेव्हा प्रॉडक्शनला हात जोडून विनंती केली होती की मला काम करू द्यावे. पण त्यावेळी मला कोणतेही सहकार्य मिळाले नाही. पण म्हणतात ना ज्याचे त्याचे कर्म त्याला येतेच. तेच घडले प्रोडक्शनसोबत. दिशा वाकानी (दयाबेन)ने डिलिव्हरीनंतर परत यावे म्हणून प्रोडक्शनने इतके हात जोडले पण ती नाही आली.