पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Rajput Anniversary) दुसऱ्या स्मृतीदिनानिमित्त पोस्ट शेअर करून सुशांतची बहीण खूप भावूक झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर भावाच्या आठवणीत एक मोठी पोस्ट लिहिलीय. टीव्ही शो पवित्र रिश्तामधून आपल्या करिअरची सुरुवात करणारे दिग्गज अभिनेते सुशांत सिंह राजपूत यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले होते. १४ जून, २०२० रोजी सुशांत सिंग राजपूतचे निधन झाले. त्यावेळी सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. सुशांतने गळफास गेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले होते. (Sushant Rajput Anniversary)
सुशांतचा मृत्यू खून होता की आत्महत्या याचा अद्याप उलगडा झालेला नाही, मात्र आज सुशांतच्या मृत्यूला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. सुशांत त्याच्या बहिणींच्या खूप जवळ होता. याप्रसंगी सुशांतची बहीण श्वेताने तिच्या भावासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
सुशांतची बहीण श्वेताने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की – 'तुला जग सोडून दोन वर्षे झाली आहेत. पण, तू ज्या मूल्यांसाठी आणि तत्त्वांसाठी नेहमीच उभा राहिलास त्यामुळं आज तू अमर झाला आहेस.'
श्वेताने पुढे लिहिले – 'दया, करुणा आणि सर्वांसाठी प्रेम हे तुझे गुण होते. तुम्हा सर्वांसाठी खूप काही करायचे होते. तुमच्या सन्मानार्थ तुमच्यातील सद्गुण आणि आदर्श आम्ही कायम ठेवू. जग चांगल्यासाठी बदलले आहे.'
श्वेताने एका दिव्याचा इमोजी पोस्ट केला आणि लिहिले – 'चला आज आपण सर्वजण दिवा लावू आणि कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी निस्वार्थपणे काम करूया.'
३४ वर्षीय अभिनेत्याचे दोन वर्षांपूर्वी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी निधन झाले. त्यानंतर अभिनेत्याच्या स्मरणार्थ पाटणा येथील त्यांच्या घराचे स्मारकात रूपांतर करण्यात आले. ज्यामध्ये त्याची दुर्बीण, पुस्तके, फ्लाइट सिम्युलेटर, गिटार आणि इतर वस्तू होत्या.
सोशल मीडियावर या अभिनेत्याची अनेकदा आठवण या ना त्या कारणाने होत असते. आजही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विटरवर #boycottBollywood ट्रेंड करत आहे. दोन वर्षांनंतरही अभिनेत्याच्या मृत्यूचे गूढ न सुटल्यामुळे त्याचे चाहते बॉलिवूडवर बहिष्कार घालत आहेत.
सुशांतने आपल्या करिअरमध्ये एका दशकापेक्षा कमी कालावधीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. 'काई पो चे', 'एम. एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'केदारनाथ', 'छिछोरे' हे त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये गणले जातात. अभिनेत्याचा शेवटचा मोठा चित्रपट 'छिछोरे' होता जो २०१९ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर त्याचा 'दिल बेचारा' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. सुशांतचा हा शेवटचा चित्रपट होता.