पुढारी ऑनलाईन डेस्क : साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडण्यासाठी सज्ज असलेल्या "धर्मवीर - २" या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते गडकरी रंगायतन, ठाणे येथे या चित्रपटाचे म्युझिक लाँच संपन्न झाले. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, म्युझिक टीम उपस्थित होती.
येत्या ९ ऑगस्टला "धर्मवीर - २" हा चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.
"धर्मवीर - २" या चित्रपटाची निर्मिती साहील मोशन आर्ट्सचे मंगेश जीवन देसाई यांनी केली आहे. लेखन-दिग्दर्शन प्रवीण तरडे, कॅमेरामन महेश लिमये यांनी काम पाहिले आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांनी राजकारण आणि समाजकारणाचा सुंदर मेळ घातला होता. त्यामुळेच त्यांची प्रचंड लोकप्रियता निर्माण झाली होती. शालेय विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा सुरू करण्याचा पहिला प्रयत्न दिघे साहेबांनीच सुरू केला होता. त्यामुळे चित्रपटाच्या म्युझिक लाँच सोहळ्यात गुरू पौर्णिमा गाण्याच्या सादरीकरणासह "चला करू तयारी..." हे गाणं उपस्थितांना दाखविण्यात आले.
दिघे साहेबांना मी जवळून भेटलो आहे. त्यांच्याकडे पाहिल्यावर भीती वाटायची पण मनातून एकदम निर्मळ होते. हा चित्रपट ९८ आठवडे चालावा अशा मी शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलावल्याबदल मी सर्वांचे आभार मानतो
चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. गीतकार मंगेश कांगणे, स्नेहल तरडे , डॉक्टर प्रसाद बिवरे, विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना अविनाश - विश्वजीत आणि चिनार-महेश यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. गाणी प्रसिद्ध गायक हरिहरन, जावेद अली, सुखविंदर सिंग, विशाल दादलानी, आदर्श शिंदे, मनीष राजगिरे प्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या आवाजात मराठी आणि हिंदी गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.