मनोरंजन

संसाराच्या नियमांत नवा पायंडा पाडणारी मालिका सौ. प्रताप मानसी सुपेकर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनाईन डेस्क : पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या देशात बायकांसाठी कायम पुरुषांपेक्षा वेगळे नियम आहेत. स्त्री-पुरुषातलं प्रेमाचं नातं असो की संसार त्यात कायम तडजोड करण्याची, घर सांभाळण्याची, मुलांवर संस्कार करण्याची, नवऱ्याची आणि त्याच्या घरच्यांची मर्जी सांभाळण्याची जबाबदारी बाईलाच पार पाडावी लागते. लग्नानंतर तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं ज्याची सुरुवात होते तिचं नाव बदलण्यापासून. आपल्या सौभाग्यवतीची कायम साथ देणार्‍या सौभाग्यवंताची गोष्ट म्हणजे सौ. प्रताप मानसी सुपेकर. शेमारू मराठीबाणा या वाहिनीवर ३० ऑक्टोबरपासून भेटीला आलीय.

संबंधित बातम्या –

ही कथा आहे वाहतूक पोलिस विभागात कार्यरत असणाऱ्या प्रताप आणि मानसी यांची. मानसी वाहतूक विभागात प्रतापपेक्षा वरच्या हुद्यावर काम करते. एकत्र काम करताना मानसीची कर्तव्यदक्षता बघून प्रतापच्या मनात मानसीविषयी आदर निर्माण होतो आणि हळूहळू यांची मने जुळतात. प्रतापच्या मनात मानसी विषयी जेवढं प्रेम आहे, त्यापेक्षा जास्त तिच्याबद्दल आदर आहे. त्याच्यासाठी ती केवळ वरिष्ठ अधिकारी नाहीये तर मार्गदर्शकही आहे.

मानसीलाही प्रतापचा स्वभाव आणि प्रामाणिकपणा भावतो. या दोघांच्या प्रेमाला मात्र प्रतापच्या घरच्या मंडळीचा विरोध आहे. या लग्नामुळे प्रताप बायकोच्या ताटाखालचं मांजर बनेल अशी भीती त्याच्या घरच्यांना आहे. बायकोला खंबीर साथ देणारा, तिला आपल्या पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणार्‍या प्रसंगी प्रवृत्त करणार्‍या प्रतापची फक्त त्याच्या घरी आणि ऑफिसमध्येच नाही तर एकूणच समाजात चेष्टा होऊ लागते, 'सौ प्रताप' असं उपहासाने त्याला हिणवलं जाऊ लागतं. अशा निर्णायक वेळी प्रताप-मानसीचं नातं डळमळीत होईल की त्यांच्या नात्याची वीण अधिक घट्ट होत जाईल, हे आपल्याला पाहायला मिळेल.

अभिनेता प्रदीप घुले 'प्रताप' ही व्यक्तिरेखा साकारत आहे. याबद्दल बोलताना तो म्हणतो की, "अतिशय वेगळा विषय असलेली ही मालिका आहे. आजच्या आधुनिक काळापेक्षाही पुढचा विचार मांडणाऱ्या या मालिकेचा विषय ऐकून मी लगेच या भूमिकेसाठी होकार दिला."

अभिनेत्री तन्वी किरण म्हणते की, "यातील मानसी ही व्यक्तिरेखा मला मनापासून भावली. प्रेम, जबाबदारी, कर्तव्यदक्षता, जिव्हाळा असे विविध पदर या भूमिकेला आहेत."

SCROLL FOR NEXT