मराठी चित्रपटसृष्टीची ग्लॅमरस 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी लवकरच 'सालबर्डी' (Salbardi) या नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात ती 'मंजुळा' ही भूमिका साकारत आहे. नुकताच तिचा या चित्रपटातील लूक समोर आला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीची 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी हिच्या आगामी 'सालबर्डी' (Salbardi) चित्रपटातील 'मंजुळा' लूकची चर्चा होतेय. मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःच्या नृत्याने आणि सौंदर्याने आपली प्रतिमा निर्माण करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 'नटरंग'मधील लावणी असो वा 'हिरकणी'मधील ऐतिहासिक आईची भूमिका, सोनालीने प्रत्येक भूमिकेत जीव ओतला आहे. आता ती पुन्हा एकदा एका अत्यंत वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या आगामी 'सालबर्डी' (Salbardi) या चित्रपटातील तिचा लूक नुकताच समोर आला असून यात ती 'मंजुळा' या पात्रात दिसत आहे.
उत्तम अभिनय आणि नृत्याने भुरळ घालणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होणार आहे. ‘सालबर्डी’ या चित्रपटातील ‘मंजुळा’ धमाकेदार गाण्यातून सोनालीचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे. ‘मंजुळा’ हे एक आयटम साँग असणार आहे. डान्सची कोरिओग्राफी फुलवा खामकरने केली आहे. गुरु ठाकूर लिखित, पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत आहे. आनंदी जोशीने स्वरसाज चढवला आहे.
भन्नाट स्टेप्स आणि एनर्डेटिक गाणे ‘मंजुळा’ प्रेक्षकांच्या पसंतीस किती उतरते हे पाहणे रंजक ठरणार आहे. ‘सालबर्डी’ या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली आहे. आजवर गुल्हर, बाबो, पाणीपुरी यासारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिग्दर्शक रमेश चौधरी यांनी दिले आहेत. आता मल्टीस्टारर ‘सालबर्डी’ हा रहस्यमयी थरारपट लवकरच भेटीला येणार आहे.
‘हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. या गाण्यात एक वेगळीच एनर्जी आहे. फुलवाने सुद्धा या गाण्यातून काहीतरी नवीन आणि एंटरटेनिंग देण्याचा प्रयत्न केला असून ते प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल.-सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री
महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेले ‘सालबर्डी’ हे गाव आणि गावात घडणाऱ्या रहस्यमय, भयावह घटनांचा थरारक शोध चित्रपटात घेण्यात आला आहे.
कोण असणार कलाकार?
'सालबर्डी' चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.