पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सोमी अली (Somy Ali) हिने नुकतेच रेडिट या सोशल नेटवर्कवर तिच्या चाहत्यांसोबत 'आस्क मी एनीथिंग' सेशन केले. यावेळी तिने तिचा एक्स बॉयफ्रेंड बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) याच्यासोबतच्या रिलेशनशीपसोबत मोठा खुलासा केला. सोमी अलीने खुलासा केला की, १९९० च्या दशकात सलमान खानच्या 'आठ वन- नाईट स्टँड्स'मुळे (eight one-night stands) तिने बॉलिवूड सोडले. विशेष म्हणजे सध्या लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याच्या पार्श्वभूमीवर तिने सलमान सोबतच्या रिलेशनशीपबाबत काही धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत.
ती म्हणाली, "मी केवळ एकच नाही तर सलमानच्या 'आठ वन-नाईट स्टँड्स'ला वैतागले होते. तसेच, माझे दररोज शारीरिक आणि मानसिक शोषण केले जात होते. जेव्हा माझ्या बॉयफ्रेंडचे ऐश नावाच्या मुलीशी सूत जुळले; तेव्हा मी बॉलिवूड इंडस्ट्री सोडली.''
सोमी अली यावेळी सलमान खान सोबतच्या तिच्या भूतकाळातील रिलेशनशीप बोलली. जेव्हा तिला विचारण्यात आले की त्याने तुला प्रेमाच्या जाळ्यात कसे ओढले? त्यावर तिने उघड केले की बॉलिवूडच्या ऑफर्स मिळाल्या असतानाही सलमानने तिला परत बॉलिवूडमध्ये येण्यापासून रोखले. कारण त्याला भीती होती की ती त्याचा खरा चेहरा सर्वासमोर आणेल.
तिने अभिनयासाठी नाही तर केवळ सलमान आवडत होता म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्याची कबुली दिली. ती पुढे म्हणाली, "मी बॉलिवूडमध्ये अभिनय करण्यासाठी गेले नव्हते. मी एक १६ वर्षीय मुलगी केवळ त्याच्या क्रशमुळे गेली होती. मी निराश झाले होते असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण मला वाटते की टेड बंडीचे वागणे सलमानपेक्षा चांगले होते."
त्यानंतर तिने एक भावूक टिप्पणी केली. ती म्हणाली, “सुशांत सिंह राजपूतने जीवन संपवले नाही; त्याची हत्या झाली. जिया खानचे काय झाले? हे आम्हाला अजूनही समजले नाही. ती गरोदर होती आणि पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. सूरज पांचोली सल्ला घेण्यासाठी सलमानकडे गेला होता. ज्यामुळे शेवटी जियाचा मृत्यू झाला.
तिने बिश्नोईला 'बॉलिवूडचा नवा दाऊद आणि छोटा शकील' असा उल्लेख केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि त्यानंतर अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे लॉरेन्स बिश्नोई गँग (gangster Lawrence Bishnoi) सध्या चर्चेत आहे. याच दरम्यान, सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली (Somy Ali) देखील चर्चेत आली आहे. कारण तिने नुकतेच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला झूम कॉलद्वारे चॅटसाठी आमंत्रित केले होते. सध्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात असलेल्या बिश्नोई याच्याशी संवाद साधण्यासाठी सोमी अलीने सोशल मीडियाचा वापर केला होता. तिने गँगस्टर बिश्नोईला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.