Smriti Mandhana Wedding Controversy: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न 23 नोव्हेंबरला सांगलीत होणार होते. चाहत्यांमध्ये या लग्नाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. मात्र दोन्ही कुटुंबांनी अचानक आरोग्याच्या कारणांमुळे लग्न स्थगित केले. यानंतर स्मृतीने आपल्या इंस्टाग्रामवरील लग्नाचे आणि प्रपोजच्या सर्व पोस्ट हटवल्या, यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली.
दरम्यान, सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला होता. या पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की, लग्न थांबण्यामागे दोन कोरिओग्राफर – नंदिका द्विवेदी आणि गुलनाज यांचा हात आहे. दोघींना लग्नातील डान्स कोरिओग्राफीसाठी बोलवण्यात आलं होतं. ही पोस्ट सोशल मीडियावर झपाट्याने पसरली आणि दोन्ही कोरिओग्राफरचे नावाने ट्रेंड होऊ लागली.
या वाढत्या चर्चे दरम्यान गुलनाजने अखेर मौन सोडत प्रतिक्रिया दिली. इंस्टाग्राम स्टोरीवर तिने लिहिले “माझ्याबद्दल आणि माझी मैत्रीण नंदिका हिच्याबद्दल जे दावे केले जात आहेत ते पूर्णपणे खोटे आहेत. आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. कोणाच्या सोबत फोटो असणे किंवा त्यांना ओळखणे याचा अर्थ असा होत नाही की आम्ही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करतो. कृपया आदर ठेवा आणि कोणताही निष्कर्ष काढू नका.”
दुसरीकडे नंदिकाने अद्याप कोणतेही विधान केलेले नाही आणि तिने आपले इंस्टाग्राम प्रोफाइल प्रायव्हेट केले आहे. स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या कुटुंबीयांकडूनही अद्याप या वादावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. लग्न स्थगित करण्यामागील नेमके कारण काय किंवा सोशल मीडिया पोस्ट का हटवण्यात आल्या, याबद्दलही दोन्ही बाजूंनी अधिकृत प्रतिक्रिया आल्या नाहीत.
लग्न पुढे ढकलल्यानंतर लगेच एवढी चर्चा होत असल्याने चाहत्यांमध्ये आणखी उत्सुकता निर्माण झाली असून, याबाबत अधिकृत माहिती येईपर्यंत सर्वांचे लक्ष स्मृती–पलाश यांच्याकडे आहे.