Smriti Irani Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi reboot
मुंबई : सोशल मिडियावर नवीन क्यों कीसाठी चाहते उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. भारतीय टेलिव्हिजन इतिहासात नवा इतिहास लिहिणारी मालिका म्हणून क्यों की सास भी कभी बहू थीकडे पाहिले जाते. तुलसी विरानीच्या व्यक्तिरेखेत अभिनेत्री स्मृति इराणीदेखील परत येते आहे
क्यों की...चे नवे एपिसोड 29 जुलैला रात्री 10.30 ला स्टार प्लसवर प्रसारित होणार आहे. या मालिकेच्या विविध आठवणींची या निमित्ताने उजळणी होते आहे. मालिकेच्या रीबुट दरम्यान अभिनेत्री स्मृति यांच्या मानधनातही घसघशीत वाढ झालेली आहे. या मालिकेसाठी त्यांना प्रती एपिसोड 14 लाख रुपये मिळणार आहेत.
तुम्हाला माहिती आहे का? क्यों की...च्या पहिल्या सीझनसाठी स्मृति इराणी यांना पर एपिसोड 1800 मिळत होते. स्मृति यांनी सीझन 2 साठी पर एपिसोड 14 लाख रुपये घेण्याच्या बातमीबाबत अजून अधिकृत जाहीर केलेले नाही.
क्यों की… च्या दुसऱ्या सीझनचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे. यामध्ये तुलसी विरानीचा तोच गुजराती साडीमधला लूक समोर आला. त्यांच्या या लूक वर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. अनेकांनी या लूकमुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्याचेही म्हटले आहे. तर अनेकांनी या मालिकेमुळे पुन्हा एकदा भूतकाळात गेल्याचे सांगितले आहे. तर एका युजरने ही मालिका म्हणजे अनुपमा सिरियलला टक्कर असल्याचे म्हणले आहे.
यावेळी चॅनेलने पोस्ट केलेल्या व्हीडियोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. ‘ तुम्हाला विश्वास बसत नाहीये ना? 25 वर्षांनंतर तुलसी विरानी परत येते आहे एका नव्या कथेसोबत.#क्यूंकीसासभीकभीबहुथी पुन्हा एकदा तयार आहे प्रत्येक घराचा भाग बनण्यासाठी. तुम्ही पण तयार आहात का?’
प्रोमोमध्ये स्मृति म्हणतात, जरूर येईन. कारण इतक्या वर्षाचे नाते जे आहे. आता वेळ आली आहे पुन्हा भेटण्याची. हे नाते खूप वर्षांचे आहे. तुमच्या सगळ्यांशी पुन्हा एकदा भेटण्यासाठी सज्ज आहे.
या मालिकेतील नव्या व्यक्तिरेखेबाबत स्मृति यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ‘ तुलसी केवळ एका व्यक्तिरेखेत नाही तर एका भावनेत परत आली आहे. एक आठवण, एक असे नाते जे काळाच्या कसोटीवर खरे उतरले आहे. अशा काळात जिथे सगळ्याच गोष्टी क्षणभंगुर आहेत अशावेळी परत येणे हे आठवणींना आमंत्रण आहे.’