मुंबई - क्योंकी सांस भी कभी बहु थीच्या सीक्वेलमध्ये पुन्हा स्मृती ईरानी दिसणार आहेत. नुकताच या मालिकेचा फर्स्ट लूक व्हिडिओ समोर आला आहे. स्मृती यांचा अभिनेत्री, राजकीय नेत्या असा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये जे यश मिळवलं, त्याच्यामागे मेहनतदेखील आहे. एक वेट्रेस म्हणून काम करणारी तरुणी मॉडेल कशी बनली आणि तिथून पुढे अभिनेत्री ते मंत्रीपदापर्यंत मजल त्यांनी मारली. आता पुन्हा कलाविश्वात त्यांनी पाऊल ठेवलं आहे. एकता कपूरच्या क्यों की सांस भी कभी बहु थी च्या नव्या मालिकेतून त्या टीव्ही विश्वात दिसणार आहेत.
स्मृती इराणी यांचा जन्म दिल्ली मध्ये २३ मार्च १९७६ रोजी झाला. वडील अजय कुमार मल्होत्रा कुरियर कंपनी चालवायचे आणि आई शिवानी बागची गृहिणी होत्या. स्मृती मल्होत्रा असे त्यांचं नाव होतं. लग्नानंतर त्या स्मृती जुबीन इराणी झाल्या. सुरुवातीचे शिक्षण होली चाईल्ड ऑक्झीसियम स्कूल नवी दिल्लीतून घेतलं. १९९४ मध्ये पुढच्या शिक्षणासाठी बी. कॉम साठी प्रवेश घेतला. पण ते पूर्ण होऊ शकले नाही. १० वीत असतानाचं त्यांनी ब्युटी प्रोडक्ट विक्री करण्याचं काम सुरु केलं होतं.
पुढे त्या मुंबईत आल्या आणि याठिकाणी वेट्रेसचे काम करू लागल्या. त्यांच्या मित्रमंडळींनी तिला मॉडेलिंग सुरु करण्याचा सल्ला दिला होता. १९९८ मध्ये त्यांनी मिस इंडियासाठी ऑडिशन दिलं आणि त्या सिलेक्टही झाल्या. पण स्मृतींनी मिस इंडियामध्ये सहभाग घेऊ नये, असे तिच्या वडिलांना वाटत होतं. परंतु आईने पाठिंबा दिला. आईने २ लाख रुपये तिला पाठवल्याचं म्हटलं जातं. मिस इंडिया स्पर्धेत स्मृती फायनालिस्ट तर बनल्या पण स्पर्धा जिंकू शकल्या नाहीत.
रिपोर्टनुसार, चित्रपटात सातत्याने नकारही झेलावे लागले. घरचे पैस परत करण्यासाठी त्यांनी नोकरी शोधली. जेट एअरवेजमध्ये फ्लाईट अटेंडन्सच्या पोस्टसाठीही अर्जही केला. पण तिथेही अपयश मिळालं. अनेक मॉडेलिंगसाठी प्रयत्न केले. पण त्यामध्येही नकाराचा सामना करावा लागला. शेवटी वेट्रेसचं काम करणं सुरु केलं.
२००० मध्ये हम हैं कल, आजकल और कल मधून कलाविश्वात पदार्पण केले. पण खरी ओळख मिळाली ती क्यों की सांस भी कभा बहु थी मालिकेमधून. २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या या मालिकेत त्यांनी जी तुलसीची भूमिका साकारली, ती इतकी लोकप्रिय ठरली की, महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात त्या आवडत्या आदर्श सून बनल्या. पुढे २००१ मध्ये रामायणमध्ये माता सीताची भूमिका त्यांनी साकारली होती. २००६ मध्ये थोडी सी जमीन थोडासा आसमा आणि विरुद्ध मालिकेत अभिनय साकारला होता. ये है जलवा शोसाठी साक्षी तन्वरसोबत होस्ट केलं. पुढे २००३ मध्ये राजकारणात प्रवेश केला. राजकीय कारकीर्दीनंतर त्या आता पुन्हा टीव्ही कला विश्वातून समोर येत आहेत.
क्योंकी सांस भी कभी बहु थी मालिकेसाठी त्यांना इंडियन टेलिव्हिजन ॲकेडमी ॲवॉर्ड मिळाला होता. याच मालिकेसाठी इंडियन टेली ॲव्हार्डने त्यांना सन्मानित करण्यात आलं. पुढे २०१० मध्ये आयटीए ॲवॉर्ड्स फॉर बेस्ट ॲक्ट्रेस पॉप्युलर चा सन्मान याच मालिकेसाठी मिळाला होता.
स्मृती ईरानी यांनी जुबिन ईरानी यांच्याशी २००१ मध्ये लग्न केलं. त्यांना मुलगा जोहर आणि मुलगी जोइश अशी दोन मुले आहेत.