अनुपमा गुंडे
सासू-सुना हा विषय चित्रपटसृष्टीला नवा नाही. सासू-सुनेच्या विषयाभोवती फिरणाऱ्या अनेक चित्रपटांनी चांगले विषय, कथानके दिली आहेत. सासू - सुनेच्या विषयाला किंवा स्त्रियांच्या अनेक प्रश्नांना पडद्यावर आणून समाजाची स्त्रियांच्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित करायला चित्रपटांनी हातभार लावला आहे.
स्मार्ट सूनबाई हे नाव असल्याने हा चित्रपट सासू-सुनांच्या नावावर भाष्य करेल किंवा सून किती स्मार्ट आहे, याची मांडणी चित्रपटात प्रगल्भतेने करेल असे वाटते, परंतु केवळ एका खुनाचे गूढ उकलण्यापुरतेच सूनबाईचे अस्तित्व मर्यादित केले आहे.
गावातल्या एका बचतगटांच्या महिलांनी चांगली कामगिरी केल्याने गावातील आमदार बचतगटांच्या महिलांची सहल प्रायोजित करतात. ही सहल एका रिसॉर्टवर येते. या सहलीत गंगा (सायली देवधर), तिचा पती रघू (संतोष जुवेकर), सासू (किशोरी शहाणे), जगताप अण्णा (दीपक शिर्के), जगताप मावशी (उषा नाईक) वंदना (स्नेहल शिदम), बंडू (भाऊ कदम), कोमल घोरपडे (प्राजक्ता हणमघर), मास्तर (योगेश शिरसाठ) यांचा समावेश आहे.
या रिसॉर्टवर आधीच शहरातील एक महिलांचा ग्रुपही आलेला असतो. गावच्या बचतगटाच्या महिला आणि शहरातील यांच्या माध्यमातून गाव आणि शहरातील दरीचे दर्शन घडते. या मतभेदातील हे रिसॉर्टमधील पर्यटक संक्रांत साजरी करतात, एकत्र खेळ खेळतात. चित्रपटाचा पहिला भाग यातच संपतो. मात्र नंतर शहरातून रिसॉर्टवर पतीसोबत आलेल्या पल्लवीचे (प्राजक्ता गायकवाड) प्रेत रिसॉर्टच्या बाजूला पाण्यात आढळते. त्यानंतर चित्रपट एका वळणावर येतो.
या खुनाचा आळ आपल्यावर येईल म्हणून सर्वजण एकमताने पोलिसांना कळवायचे सोडून तिचे प्रेत लपवून ठेवतात आणि या खुनाचा तपास स्मार्ट सूनबाई आणि त्यांचे पती कसा करतात, हे खुनाचे गूढ स्मार्ट सूनबाई कशा उलगडतात, हे चित्रपटात पाहणे इष्ट. बचतगटाची महिला शक्ती दाखवली आहे.
बचतगटाच्या महिलांनी तयार केलेल्या गोधड्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद घेतली जाते. या गोधड्यांची मोठी ऑर्डर या बचतगटाला देण्यासाठी एक व्यावसायिक आणि खुद्द ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री पोपट पवार (पाहुणे कलाकार) म्हणून येतात. पण खरे तर या बचतगटाच्या विषयाच्या माध्यमातून दिग्दर्शकाला एक स्मार्ट, कर्तबगार आणि समंजस सूनबाई उभी करता आली असती, मात्र केवळ एका खुनाच्या तपासात मदत करणारी एक सूनबाई दाखवून ती स्मार्ट करण्याचा आटापिटा केल्याचे उत्तरार्धात जाणवते.
बाकी चित्रपटातील गमती-जमती करण्याच्या नादात काही अतिशयोक्ती पूर्ण विनोदाची निर्मिती हास्यास्पद झाली आहे. सासू-सुनेचे नाते आणि स्त्रीवर्गाची सुख-दुःखे मांडण्याचा प्रयत्न संवादातून झाला आहे, चित्रपटात म्हणी आणि ग्रामीण बोलीचा समर्पक वापर करण्यात आला आहे. सून आणि सासू या विषयाला हात घालणारा हा चित्रपट एका खुनाचे गूढ उलगडण्यात खर्ची घातला आहे. एकापेक्षा एक सरस कलाकारांच्या भूमिका आहेत, सगळ्यांनी भूमिकांना न्यायही दिला आहे, मात्र प्रत्येक गोष्ट स्मार्ट करण्याच्या नादात चित्रपट स्मार्टपणा दाखविण्यात कमी पडला आहे.