‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटातील सिद्धार्थ जाधवचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चेहऱ्यावरचे क्रौर्य आणि नजरेतला दरारा पाहून चाहते थक्क झाले असून, सिद्धार्थचा हा गंभीर अवतार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
Siddharth jadhav new look in Punha Shivaji raje Bhosale
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव याचा एक नवा आणि अप्रतिम लूक सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहे. ‘कॉमेडीचा बादशाह’ म्हणून ओळखला जाणारा सिद्धार्थ आता एका गंभीर आणि धडकी भरवणाऱ्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’चा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यातील सिद्धार्थचा अवतार पाहून चाहते अवाक झाले आहेत.
या पोस्टरमध्ये सिद्धार्थ जाधवच्या चेहऱ्यावर तीव्र राग, डोळ्यांत दरारा आणि चेहऱ्यावर रक्ताचे डाग दिसत आहेत. त्याचा हा रूप पाहून चाहत्यांना तो पहिल्यांदाच इतक्या गभीर आणि शक्तिशाली लूकमध्ये पाहायला मिळत आहे.
महेश वामन मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नव्या पोस्टरने ही उत्सुकता आणखी वाढवली आहे. लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसानिमित्ताने या चित्रपटातील त्याचा लूक उलगडण्यात आला आहे. त्याने आतापर्यंत कधीही न साकारलेल्या भूमिकेत तो दिसणार आहे. ही भूमिका त्याने आजवर साकारलेल्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे. चेहऱ्यावरील रक्त, डाग, भेदक नजर आणि क्रोर्य असा लूकसह सिद्धार्थ जाधव नव्या पोस्टरमध्ये दिसत आहे. या लूकमुळे त्याची यात नेमकी काय भूमिका असेल याबद्दलची उत्कंठा वाढली आहे.
सिद्धार्थ जाधव म्हणाला, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटातील माझी ही भूमिका सगळ्यात वेगळी आहे. मी साकारलेले पात्र क्रूर आहे. ती या लूकमध्ये उतरणे खूप गरजेचे होतं. तितकी मेहनत घेताना या लूकचं पूर्ण श्रेय महेश सरांना जातं. त्यांनी मला माझा एक फोटो पाठवायला सांगितला आणि त्यावर काम करून माझा हा लूक तयार केला. जेव्हा हा लूक माझ्याकडे आला, तेव्हा मी स्वतःच अवाक झालो. मी असाही दिसू शकतो का? असा प्रश्न मला पडला होता.''द ग्रेट मराठा एन्टरटेनमेंट, सत्य-सई फिल्म्स आणि क्रिझोल्हची निर्मिती असलेला हा चित्रपट आहे. येत्या ३१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
सिद्धार्थ बोडकेने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलीय. या चित्रपटात विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने ,नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, सयाजी शिंदे हे कलाकार असतील. शिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.
महेश मांजरेकर यांची कथा, संवाद सिद्धार्थ साळवी, राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांची निर्मिती आहे.