Shweta Tiwari Raj Thackeray Pudhari
मनोरंजन

Shweta Tiwari: आधी मनसेवर आरोप, आता राज ठाकरेंचे मानले आभार; श्वेता तिवारीच्या पोस्टने पुन्हा खळबळ, नेमकं काय घडलं?

Shweta Tiwari Raj Thackeray: महिलांविरोधातील सोशल मीडिया ट्रोलिंगवरून श्वेता तिवारीने काही दिवसांपूर्वी मनसे समर्थकाबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

Rahul Shelke

Shweta Tiwari Raj Thackeray: सोशल मीडियावरील पोस्टमुळे अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी महिलांविरोधात अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या सोशल मीडिया युजरवरून तिने मनसे समर्थकावर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, आता याच प्रकरणात तिने मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि राज ठाकरेंचे आभार मानले आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि श्वेता तिवारीने अचानक राज ठाकरेंना ‘थँक्यू’ का म्हटलं? जाणून घेऊया.

आक्षेपार्ह कमेंट्सवरून श्वेताने केली होती पोस्ट

काही दिवसांपूर्वी श्वेता तिवारीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. तिच्या म्हणण्यानुसार, एक व्यक्ती तिच्याबद्दल आणि महिलांविषयी आक्षेपार्ह तसेच अपमानास्पद भाषा वापरत होती. या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्याऐवजी तिने संबंधित सोशल मीडिया अकाऊंट्सचे स्क्रीनशॉटही पोस्ट केले होते.

अशा प्रकारे ऑनलाइन महिलांचा अपमान करणाऱ्यांना सहजपणे मोकळे सोडले जाऊ नये, अशी तिची भूमिका होती. ती व्यक्ती स्वतःला मनसेचे समर्थक असल्याचे सांगत होती यावरुन श्वेताने राज ठाकरे यांना काही प्रश्न विचारले होते.

Shweta Tiwari Raj Thackeray
Shweta Tiwari Raj Thackeray

मनसेच्या नेत्या स्नेहल अडारकर यांनी साधला संपर्क

श्वेताच्या पोस्टनंतर मनसेच्या नेत्या स्नेहल अडारकर यांनी तिच्याशी संपर्क साधल्याचे तिने आपल्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले आहे. महिलांविरोधात अपमानास्पद वर्तन कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असे आश्वासन त्यांना देण्यात आल्याचे श्वेताने म्हटले.

तपासात संबंधित व्यक्ती पक्षाचे अधिकृत सदस्य नसल्याचेही स्पष्ट करण्यात आल्याची माहिती तिने दिली. मात्र, या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तीची माहिती शोधून काढण्यासाठी काही वेळ मागण्यात आला होता.

तीन दिवसांत मिळाला प्रतिसाद

श्वेता तिवारीच्या म्हणण्यानुसार, अवघ्या तीन दिवसांत संबंधित व्यक्तीचा फोन नंबर आणि त्याने लिहिलेला माफीनामा तिच्यापर्यंत पोहोचवण्यात आला. हा मुद्दा गांभीर्याने हाताळण्यात आला आणि महिलांचा अपमान पक्षाकडून कधीही सहन केला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचेही तिने नमूद केले. या संपूर्ण प्रक्रियेत तिला भविष्यात अशा प्रकारचा कोणताही त्रास झाल्यास थेट संपर्क करण्यास सांगण्यात आल्याचे श्वेताने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

माफीनामा केला शेअर

या प्रकरणात संबंधित व्यक्तीकडून आलेला माफीनामा श्वेता तिवारीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, तिच्या मते हा प्रश्न केवळ एका व्यक्तीपुरता किंवा एका घटनेपुरता मर्यादित नाही.

सोशल मीडियावर वाढत चाललेले ट्रोलिंग, महिलांविरोधातील आक्षेपार्ह टिप्पणी आणि ऑनलाइन गैरवर्तन ही मोठी समस्या आहे. या प्रकारांवर अधिक प्रभावी उपाययोजना होणे गरजेचे असल्याची भूमिकाही तिने मांडली.

राज ठाकरेंना म्हटले ‘थँक्यू’

या संपूर्ण प्रकरणात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घातल्याबद्दल श्वेता तिवारीने त्यांचे कौतुक केले. तसेच हा विषय गांभीर्याने हाताळल्याबद्दल तिने राज ठाकरे यांचेही विशेष आभार मानले. त्यामुळे श्वेता तिवारीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT