‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटात शिवानी सुर्वे पूर्णपणे वेगळ्या नक्षल लूकमध्ये झळकणार आहे. तिच्या रफ-टफ अवताराचा फोटो व्हायरल झाला असून चाहत्यांनी तिच्या या बदलाचे भरभरून कौतुक केले आहे.
मुंबई - मराठी टेलिव्हिजनमधील लोकप्रिय नाव शिवानी सुर्वे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. कारण आहे तिचा आगामी चित्रपट ‘आफ्टर ओएलसी’ (After OLC) मधील लूक, नेहमी स्टायलिश, ग्लॅमरस आणि बॉस लेडी लूकमध्ये दिसणारी शिवानी या वेळी पूर्णपणे वेगळ्या अवतारात प्रेक्षकांसमोर येत आहे. ती नक्षलवाद्याच्या रफ-टफ लूकमध्ये दिसतेय. तिचे या चित्रपटातील फोटो व्हायरल झाले आहेत.
शिवानीने शेअर केलेल्या पहिल्या लूक पोस्टरमध्ये तिचा चेहरा मातीने माखलेला, केसांचे रफ जंगली वेणीबद्ध स्वरूप, डोळ्यातील आक्रमकपणा आणि हातातील रायफल अशा जबरदस्त अंदाजात ती दिसते.
नक्षलवादी दिसण्यासाठी शिवानीची अपार मेहनत
नक्षलवादी वेशात दिसण्यासाठी शिवानीने बरीच मेहनत घेतली आहे. इतकेच नाहीतर हा चित्रपट संपूर्ण भारतात मराठी, कन्नड, आणि हिंदी भाषेतही रिलीज होणार आहे. त्यामुळे कन्नड बोलण्यासाठी तिने विशेष मेहनत घेतलीय. या चित्रपटाचे दिग्दर्शन सडागारा राघवेंद्र यांनी केले आहे.
’आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लूकबाबत बोलताना शिवानीने म्हटलं, "आजवर मी जे सिनेमे केले आहेत त्यातील भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी आहे. त्याहीपेक्षा भूमिकेसाठीचा लुक वेगळा आहे. माझा या चित्रपटात नक्षलवादी लूक आहे. बॉडी लॅग्वेज, हावभाव यावर काम केलं.''
शिवानी पुढे म्हणाली, ''कन्नड शिकण्यासाठी कर्नाटकला वर्कशॉपमध्ये गेले. कन्नडमधील सगळे डायलॉग मराठीत लिहून मग ते पाठांतर केलं. बंडखोर मताची भूमिका मी आजवर केलेली नाही. त्यामुळे हा वेगळा अनुभव आहे".
"चित्रपटात ॲक्शन सीन्स असून त्यासाठी ‘केजीएफ’, ‘कांतारा’चे फाईट मास्टर विक्रम मोर यांनी ‘आफ्टर ओएलसी’ साठी फाईट मास्टरची जबाबदारी सांभाळली आहे,'' असेही तिने नमूद केले.
या चित्रपटात शिवानीची शक्ती ही भूमिका आहे. ती एका नक्षल ग्रुपची लीडर आहे. बाबांचा वारसा ती पुढे चालवत आहे. त्यामुळे तिचे हे पात्र कमांडिंग आहे.
निर्मिती दिपक पांडुरंग राणे, विजयकुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ अंतर्गत केली आहे. हा चित्रपट २८ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.