Shilpa Shinde Controversy Pudhari
मनोरंजन

Shilpa Shinde Video: ‘खोट्या गोष्टी पसरवू नका!’; शिल्पा शिंदेची नवी पोस्ट चर्चेत, जुन्या वादाला पुन्हा दिली फोडणी

Shilpa Shinde Controversy: लैंगिक छळाच्या आरोपांबाबतच्या वादानंतर अभिनेत्री शिल्पा शिंदेने सोशल मीडियावर नवी पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Shilpa Shinde Controversy: 'भाभीजी घर पर हैं' या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आहे. निर्माते संजय कोहली यांच्याविरोधात केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांबाबत तिने नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तिच्या या कबुलीनंतर सोशल मीडियावर आणि मनोरंजन क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच शिल्पाने आता एक नवी पोस्ट शेअर करत स्वतःची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

शिल्पा शिंदेने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये जनसंपर्क (PR) आणि काही माध्यमांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. "तुमचं काम करत राहा, पण प्रकरणाबाबत खोट्या कथा आणि चुकीचे निष्कर्ष पसरवणं थांबवा," असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

तिने लैंगिक छळाची व्याख्या स्पष्ट करताना लिहिले की, एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ, घाबरलेले, अपमानित किंवा दुखावलेले वाटेल असे कोणतेही लैंगिक वर्तन म्हणजे लैंगिक छळ होय. चुकीचा शारीरिक स्पर्श, अश्लील किंवा लैंगिक स्वरूपाची टिप्पणी, अयोग्य मेसेज, चुकीची जवळीक साधण्याची कृती किंवा अश्लील हावभाव यांचा त्यात समावेश होतो.

यासोबतच तिने "तुमच्या स्वतःच्या बनावट कथा पसरवू नका" असेही स्पष्ट शब्दांत म्हटले. पोस्टच्या शेवटी तिने "जागो ग्राहक जागो" असा उल्लेख करत निर्माते बिनेफर कोहली आणि संजय कोहली यांनाही टॅग केले आहे.

दरम्यान, हा संपूर्ण वाद 2016 मध्ये सुरू झाला होता. त्या वेळी शिल्पा शिंदेने अचानक 'भाभीजी घर पर हैं' ही मालिका सोडली होती. मालिकेच्या निर्मात्यांनी तिच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना शिल्पाने मानधन न मिळणे आणि मानसिक छळ होत असल्याचा दावा केला होता.

यानंतर 2017 मध्ये तिने निर्माते संजय कोहली यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. मात्र अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये बोलताना शिल्पाने त्या काळातील काही घटनांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला.

या प्रकरणावरून सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काही जण शिल्पाच्या भूमिकेचे समर्थन करत आहेत, तर काही जण तिच्या विरोधात प्रतिक्रिया देत आहेत. अशातच तिची ही नवी पोस्ट चर्चेचा विषय ठरली असून या वादाला आणखी एक नवे वळण मिळाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT