मनोरंजन

Shahrukh Khan on Nana Patekar : 'तू हिरो नाही, अभिनेता आहेस'; नानांनी शाहरुखला दिलेला गुरुमंत्र, SRK ची भावनिक पोस्ट

कॅरमचा डाव, गोड ओरडा आणि घट्ट मिठी; नाना पाटेकरांच्या आठवणीत शाहरुख खान भावूक.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू आणि दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (दि. ८) सकाळी गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने कलाविश्वासह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. आज पुण्यात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नाना यांच्या अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख याने नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा देत अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे.

‘‘ते सांगायचे, जे ऐकणे गरजेचे होते...’’

शाहरुखने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलंय की, “जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दरारा आणि माझी स्वतःची भीती यामुळे मी माझ्या केसांत बोटे फिरवू लागलो. त्यांनी तात्काळ माझा हात झटकला आणि म्हणाले— ‘हिरोसारखे केस ठीक करू नकोस... तू ॲक्टर आहेस!’

एसआरके पुढे सांगतो की, ‘‘नाना कधीच खोटी प्रशंसा करायचे नाहीत. तुम्ही जे ऐकू इच्छिता ते न सांगता, जे तुमच्यासाठी ऐकणे गरजेचे होते तेच ते सांगायचे. असे होते नाना. अतिशय स्पष्टवक्ते, कठोर, प्रामाणिक आणि तितकेच लोभस हास्य असणारे व्यक्तिमत्त्व.”

त्यांच्या ओरडण्यामागे दडलेले अथांग प्रेम

नाना पाटेकर यांच्या प्रेम व्यक्त करण्याच्या अनोख्या शैलीबद्दल सांगताना शाहरुख पुढे म्हणाला, “त्यांचे प्रेम व्यक्त करण्याची पद्धत नेहमीच वेगळी असायची. ते आधी तुमच्यावर खेकसायचे, ओरडायचे. असे तीनचार वेळा हूओन गेल्यानंतर अचानक ते तुम्हाला मिठी मारायचे. त्यांचे माझ्यावर खूप प्रेम होते आणि मीसुद्धा त्यांच्यावर तेवढेच प्रेम करायचो. ते माझे मार्गदर्शक, गुरू, समीक्षक आणि मित्र होते. कॅरमच्या प्रत्येक खेळात ते मला हरवायचे आणि त्या विजयाचा मनमुराद आनंद साजरा करायचे.”

‘‘चित्रपटसृष्टीत कधीही न भरून निघणारी पोकळी’’

नानांच्या आठवणीत भावूक झालेल्या शाहरुखने शेवटी लिहिले, “नाना, तुमचे धीर-गंभीर असणे, तुमचे हास्य, तुमचा वेडेपणा आणि तुमचे प्रेम कायम आमच्यासोबत राहील. कदाचित.. आपल्याकडे आणखी थोडा वेळ बोलण्यासाठी, वाद घालण्यासाठी, चहाचा आणखी एक घोट घेण्यासाठी आणि कॅरमचा आणखी एक डाव खेळण्यासाठी असता तर... तुम्ही केवळ चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर जगभरातील चाहत्यांच्या हृदयात अशी पोकळी निर्माण केली आहे जी कधीही भरून निघणार नाही. मी तुम्हाला खूप मिस करेन आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमची एक शिकवण हृदयात जपेन— ‘हिरो बनण्याच्या नादात स्वतःतला ॲक्टर गमावू नकोस.’ नाना, तुमच्या आत्म्याला शांती लाभो. एक अद्वितीय अभिनेता आणि कॅरम चॅम्पियन... तुम्ही खूप लवकर निघून गेलात, माझे ‘हिरो ॲक्टर’!”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT