Bollywood : "‘गौरी तुला खूप लुटेल!’ मीका सिंहला शाहरुख खानने दिला होता इशारा; घराच्या इंटिरियरमागची रंजक गोष्ट" file photo
मनोरंजन

Bollywood : "‘गौरी तुला खूप लुटेल!’ मीका सिंहला शाहरुख खानने दिला होता इशारा; घराच्या इंटिरियरमागची रंजक गोष्ट"

‘माझ्या निवडीवर प्रश्न विचारू नकोस’; गौरी खानच्या अटीचा आणि शाहरुखच्या इशाऱ्याचा खुलासा

पुढारी वृत्तसेवा

shah rukh khan hilarious warning to mika singh about gauri khan interior design bahaut lootegi

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड गायक मीका सिंहची इच्छा होती की शाहरुख खानची पत्नी आणि प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर गौरी खान यांनी त्याच्या नव्या घराचे इंटिरियर डिझाइन करावे. मात्र, यावेळी शाहरुखने त्याला एक मजेशीर इशारा दिला होता.

बॉलिवूडमधील सुपरहिट पार्टी गाण्यांसाठी ओळखला जाणारा गायक मीका सिंह आपल्या दमदार आवाजासोबतच आलिशान जीवनशैलीसाठीही प्रसिद्ध आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्‍याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि यशाच्या प्रवासाबाबत काही आश्चर्यकारक खुलासे केले, ज्यामुळे चाहतेही थक्क झाले.

मीका सिंहने सांगितले की, आज देशभरात त्यांच्या मालकीच्या जवळपास 99 मालमत्ता आहेत. त्यांनी कधीही इतक्या मालमत्तांचे स्वप्न पाहिले नव्हते. तसेच त्याने शाहरुख खान आणि गौरी खान यांच्याशी संबंधित एक मजेशीर आठवणही शेअर केली.

मीका सिंह काय म्हणाला?

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत मीका म्हणाला, “माझ्याकडे 99 प्रॉपर्टीज असतील, असे मी कधीच स्वप्नातही विचार केला नव्हता. मात्र, गायक बनण्याचे स्वप्न मी नक्की पाहिले होते. माझा पहिला पगार फक्त 75 रुपये होता. त्या कमी कमाईबद्दल मला कधीच खंत वाटली नाही. वयाच्या 13व्या वर्षी तेवढे पैसे मिळाले तरी मी खूप आनंदी होतो. मी अनेक जागरणांमध्ये गाणी गायली. त्यानंतर माझे भाऊ दलेर मेहंदी यांनी मला खूप मदत केली. त्यांच्याकडून मी बरेच काही शिकलो. तेव्हाच मला समजले की प्रतिभेच्या जोरावर माणूस बरेच काही मिळवू शकतो.”

अंधेरीतील फ्लॅटची रंजक गोष्ट

अंधेरीमधील आपल्या मालमत्तेबाबत बोलताना मीका म्हणाला, “या फ्लॅटशी संबंधित एक मजेदार गोष्ट आहे. मी हा फ्लॅट 2012 मध्ये विकत घेतला. त्याआधी मी अंधेरी पश्चिमेतील शास्त्री नगरमध्ये राहत होतो आणि तिथे आनंदात होतो. कोणीतरी मला सांगितले की, येथे एक अतिशय चांगली इमारत आहे, ती पाहायला हवी. मी ती पाहिली आणि त्याच इमारतीत तब्बल सहा फ्लॅट खरेदी केले. तेव्हा ती इमारत पूर्णपणे रिकामी होती. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सहा वर्षे लागली आणि अखेर 2018 मध्ये मला त्याचा ताबा मिळाला.”

शाहरुख खानचा मजेशीर इशारा

गौरी खानकडून घराचे इंटिरियर डिझाइन करून घेण्याबाबत झालेल्या चर्चेची आठवण सांगताना मीका म्हणाला, “मी शाहरुख खानला भेटलो. तो माझा खूप चांगला मित्र आणि मोठ्या भावासारखा आहे. मी त्याला विनंती केली की गौरी खानला माझ्या घराचे डिझाइन करण्यास सांगावे. त्यावर शाहरुख हसत म्हणाला, ‘गौरी तुला खूप लुटेल’, म्हणजेच यासाठी तुला खूप खर्च करावा लागेल. पण मी आग्रह सोडला नाही आणि शेवटी गौरी खानची भेट घेतली. तिची एकच अट होती – ‘माझ्या निवडीवर कधीही प्रश्न विचारू नकोस.’ तिने संपूर्ण घर तयार करण्यासाठी तब्बल दोन वर्षे घेतली.”

मीका सिंह बद्दल

मीका सिंहचा जन्म 10 जून 1977 रोजी अमरीक सिंह या नावाने झाला. तो भारतीय पार्श्वगायक, रॅपर, संगीतकार आणि लाइव्ह परफॉर्मर आहे. त्याच्या ऊर्जावान पार्टी गाण्यांमुळे आणि पंजाबी-पॉप शैलीमुळे तो विशेष लोकप्रिय आहे. तो प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांचा धाकटा भाऊ आहे.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तो बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय पार्टी गायकांपैकी एक राहिला आहे. ‘मौजा ही मौजा’, ‘दिल में बजी गिटार’, ‘सुबह होने ना दे’, ‘जुम्मे की रात’, ‘आज की पार्टी’, ‘गंदी बात’, ‘हीर तो बड़ी सॅड है’, ‘चिंता ता ता चिता चिता’, ‘धन्नो’, ‘लाँग ड्राइव्ह’ आणि ‘पार्टी तो बनती है’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांना त्याने आवाज दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT