महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांची निर्मिती असलेली नवी मालिका भेटीला  Instagram
मनोरंजन

Marathi New TV Serial | 'सावळ्याची जणू सावली' नवी मालिका लवकरच

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - ‘सावळ्याची जणू सावली’. या मालिकेची कथा आहे सावली या आळंदी मध्ये राहणाऱ्या , रंग रूपाने साधारण पण गुणांनी असाधारण असणाऱ्या मुलीची. सावलीला दैवी सुरांची देणगी लाभलेली आहे. स्वभावाने प्रेमळ असलेली सावली दिलेल्या शब्दाला जागणारी आहे. वडील एकनाथ आणि आई कान्हू यांच्याप्रमाणेच सावलीचीही पांडुरंगावर अपार श्रद्धा आहे. तिच्या आयुष्यात त्याचं स्थान अनन्यसाधारण असच आहे. त्यामागे तेवढंच खास कारणही आहे. सावलीचा जन्म झाला तेंव्हा ती श्वास घेत नसल्यामुळे एकनाथ तिला विठ्ठलाच्या चरणी ठेवतो आणि देवाला खडे बोल सुनावतो. तोच चमत्कार होतो आणि सावली श्वास घ्यायला लागते. विठ्ठलाच्या सावलीत तिने श्वास घेतला त्यामुळे एकनाथ तिचं नाव सावली ठेवतो. याचदरम्यान प्रसिद्ध गायिका भैरवी वझेची नजर सावलीच्या गायनावर पडते.

आपल्या मुलीला म्हणजे ताराला मोठी गायिका बनवण्याचं स्वप्न बघणारी भैरवी सावलीच्या बिकट आर्थिक परिस्थतीचा फायदा घेत तिच्या वडिलांसोबत एक करार करते ज्यात ती सावलीचा आवाज आयुष्यभरासाठी स्वतःकडे गहाण ठेवते. त्याचवेळी शहरातल्या सगळ्यात मोठ्या कॉस्मेटीक्स कंपनीची मालकीण असलेली तिलोत्तमा आपल्या धाकट्या मुलासाठी म्हणजेच सारंगसाठी योग्य वधू शोधत असते. तिलोत्तमाच्या घरात, तिच्या जगात आसपास कुठेही कुरूप गोष्टींना जागा नाही. तिच्या घरात फक्त तीनच तऱ्हेच्या गोष्टी खपवून घेतल्या जातात ..सुंदर ..अतिसुंदर आणि नितांतसुंदर...!

तिलोत्तमा सारंगवर जीवापाड प्रेम करते आणि अशा या घराशी कळत नकळत धागे जुळत जातात सावलीचे. या मालिकेत सुलेखा तळवलकर, वीणा जगताप, साईंकित कामत, गौरी किरण अश्या तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. या मालिकेचं अजून एक विशेष आकर्षण असणार आहे ते म्हणजे या मालिकेत अभिनेत्री मेघा धाडे एका मत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. कोठारे व्हिजनची ही मालिका असून महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे या मालिकेचे निर्माते आहेत.

काय होईल जेव्हा समोरा समोर येतील सावली आणि सारंग? काय होईल जेंव्हा तिलोत्तमाच्या सौंदर्याचं अमाप वेड असलेल्या जगात घडून येईल उलथापालथ? जगाला कधी कळू शकेल की भैरवी वझेच्या मुलीचा म्हणजे ताराचा खरा आवाज सावली आहे? विठ्ठलाची भक्त असलेली सावली कशी शोधेल तिच्या जीवनाची वाट? हे पाहण्यासाठी सावलीची कहाणी ‘सावळ्याची जणू सावली’ १६ सप्टेंबरपासून रोज संध्या. ७ वा. झी मराठीवर पाहता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT