दिग्गज अभिनेत्री सरोजा देवी यांचे बेंगळुरूमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्या 87 वर्षांच्या होत्या. 1957मध्ये त्यांनी अभिनयक्षेत्रात प्रवेश केला. बी आर पुंथलू यांनी त्यांना सिनेसृष्टीत आणले. कानडी सिनेमात त्यांना अभिनय सरस्वती म्हणून ओळखले जात होते. त्यांनी त्यांच्या सिनेमाचा परीघ फक्त कानडी सिनेमापुरताच मर्यादित ठेवली नाही. याशिवाय तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेतही त्यांनी काम केले होते.
आपल्या कारकिर्दीत 200 हून अधिक सिनेमात काम केले. वयाच्या 17 व्या वर्षी महाकवी कालिदास या कन्नड भाषेतील क्लासिक सिनेमातून यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. एम जी रामचंद्रन यांच्या नादोदी मन्नान या सिनेमाने त्या स्टार म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
आपल्या पूर्ण करियरमध्ये सरोजा देवी यांना अनेक सन्मान मिळाले. त्यांना1969 मध्ये पद्मश्री 1992 पद्मभूषणने सन्मानित केले गेले. याशिवाय त्यांना तमिळनाडूचा कलाईमणी आणि बेंगलोर विश्वविद्यालयाची मानद डॉक्टरेट मिळाली होती. याशिवाय त्यांना सिनेमासाठीच्या 53 व्या राष्ट्रीय पुरस्कारासाठीच्या निवड समितिवरही काम केले होते.
7 जानेवारी 1938मध्ये बेंगळुरूमध्ये सरोजा देवी यांचा जन्म झाला. आपल्या भावंडांत त्या चौथ्या नंबरला होत्या. 1986मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले.
1960च्या दशकात कन्नड फॅशन जगतावर सरोजा देवी यांच्या स्टाइलचा प्रभाव होता. त्यांच्या साड्या, दागिने आणि हेअरस्टाइल त्या काळात स्टाइल स्टेटमेंट बनल्या होत्या. केवळ स्क्रीनवरच नाही तर पडद्यामागेही त्यांचा वावर अत्यंत शालीन होता. त्यांचे निधन म्हणजे एका युगाचा अंत समजला जातो.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी शिवाजी गणेशन, राजकुमार, जेमिनी गणेशन, एन टी रामाराव या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले. पण एम जी रामचंद्रन आणि त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या जोडीने तब्बल 26 ब्लॉकबस्टर सिनेमे एकत्र केले. तर शिवाजी गणेशन यांच्यासोबत 22 सिनेमात एकत्र काम केले.
बी सरोजा देवी याना कन्नड सिनेमांची पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. त्यांच्या जाण्याने कन्नड सिनेमातील एका युगाचा अंत झाल्याचे बोलले जात आहे.