Samruddhi Kelkar jumps in the deep well
मुंबई - स्टार प्रवाहच्या हळद रुसली कुंकू हसलं मालिकेतील कृष्णा म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकरने सीनसाठी शेतातील ४० फूट खोल विहिरीत उडी मारली. स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या हळद रुसली कुंकू हसलं मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराचं कौतुक होताना दिसतंय. या मालिकेतील जिगरबाज कृष्णा प्रेक्षकांना विशेष भावतेय. कृष्णाने तिची लाडकी गाय स्वातीला वाचवण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतलाय. शेतातल्या विहिरीत स्वाती पडल्याचं कळताच मागचा पुढचा कोणताही विचार न करता कृष्णाने या विहिरीत उडी मारली. मालिकेतला हा अतिशय कठीण प्रसंग कृष्णा म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकरने जिद्दीने पूर्ण केला.
या अनुभवाविषयी सांगताना समृद्धी म्हणाली, 'मला पोहायला येतं मात्र इतक्या खोल पाण्यात मी कधीही उतरले नव्हते. या सीनविषयी कळताच तो कसा शूट होणार याची उत्सुकता होती. अखेर शूटचा तो दिवस उजाडला. कोल्हापुरातल्या एका शेतातल्या ४० फूट खोल विहिरीत उडी मारण्याचा सीन होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका टेकमध्ये हा सीन पूर्ण करायचा होता. मी कोणताही बॉडी डबल न घेता हा सीन करण्याचा ठरवलं. मनाची तयारी केली आणि मी विहिरीत उडी घेतली.'
'हा अनुभव मी कधीही विसरणार नाही. मालिकेच्या संपूर्ण टीमने यासाठी खूप मेहनत घेतली आणि माझी काळजीही घेतली. दोन पट्टीचे पोहणारे विहिरीत माझ्यासोबत होते. मला धाडसी प्रयोग करायला नेहमीच आवडतं. या सीननंतर माझा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे असंच म्हणेन.' हळद रुसली कुंकू हसलं दुपारी १ वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.