Salman Khan Galaxy Apartment News
मुंबई - सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अर्पाटमेंट घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. २३ वर्षांचा छत्तीसगढ येथील राहणारा जीतेंद्र कुमार आणि मुंबईची ईशा छाबडा अशी त्यांची नावे आहेत. दोन दिवसात दोघांची घुसखोरी हा चर्चेचा विषय बनला आहे. पहिली घटना २० मे ची आहे. तर दुसऱ्या घटनेत काल गुरुवारी रात्री ईशा नावाच्या महिलेने गॅलेक्सीमध्ये घुसण्य़ाचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून या प्रकरणाची चौकशी करत आहेत. काही दिवसांपूर्वी सैफ अली खानवर घरात घुसून हल्ला झाल्यानंतर आता 'गॅलेक्सी'मधील घुसखोरी चर्चेचा विषय बनला आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो व्यक्ती सकाळी इमारतीच्या गेटवर पहिल्यांदा आला आणि त्याने तो चाहता असल्याचे आणि बॉलिवूड स्टारला भेटू इच्छित असल्याचे सांगितले. गेटवर तैनात असलेल्या हवालदाराने त्याला आत येण्यास नकार दिल्यावर त्याने रागाच्या भरात त्याचा मोबाईल फोन फोडला. त्याच संध्याकाळी, संध्याकाळी ७:३० च्या सुमारास, तोच व्यक्ती परत आला आणि आत घुसण्याचा प्रयत्न करण्यासाठी एका रहिवाशाचे वाहन अडवले. त्याने कम्पाऊंड तोडले आणि इमारतीकडे धावला. परंतु ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी त्याला अडवले.
याबाबत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने म्हटले की, त्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ रोखले. त्याला सलमनच्या घरात जाऊ दिले नाही. नंतर त्याला वांद्रे पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत खार येथील महिलेला वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतले. ती सातत्याने सलमानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होती. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिची चौकशी केली जात आहे.
लॉरेन्स गँगकडून धमकी मिळाल्यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याला Y+ कॅटेगरी सुरक्षा आहे. त्याच्यासोबत २४ तास कमांडो, जवान असतात.