विनोदी कलाकार प्रणित मोरेने बिग बॉस १९ मध्ये ११ वा सदस्य म्हणून प्रवेश केला आहे. प्रणितने सलमान खानला आपल्या विनोदाने स्टेजवर खूप हसवले. बिग बॉसमध्ये महाराष्ट्रातील प्रणितला पाहून त्याचे चाहते सोशल मीडियावर त्याला खूप सपोर्ट करत आहेत. प्रणितने फरहाना भट्टसोबत घरात एन्ट्री घेतली आहे.
मुंबईचा मुलगा प्रणित मोरे आज मराठी स्टॅन्डअप कॉमेडी जगतात एक ओळखीचं नाव बनला आहे. मूळचा मुंबईचा असलेला प्रणितने एमबीए मार्केटिंगमध्ये शिक्षण घेतले आणि सुरुवातीला इन्शुरन्स विक्रीचं काम केलं. मात्र, मित्राच्या सल्ल्याने त्याने रेडिओ क्षेत्रात पाऊल टाकलं आणि त्याचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला.
प्रणितचा पहिला शो होता "प्रणितचा शो", जो रेडिओ मिरची मुंबई मराठीत खूप लोकप्रिय झाला. हळूहळू त्याने हिंदी शो होस्ट करायला सुरुवात केली आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलाखत घेऊ लागला. 2019 ते 2023 या काळात त्याने रेडिओवर काम करत असताना आपलं स्वतःचं नाव निर्माण केलं.
रेडिओसोबतच 2018 मध्ये त्याने स्टॅन्डअप कॉमेडीची सुरुवात केली होती. त्याचे शो साधारण १ ते १.५ तासांचे असतात, आणि त्याच्या जोक्समध्ये तो नेहमी त्याला चांगलं वाटतं त्याच्यावरच बोलतो. त्याचा सर्वात प्रसिद्ध शो म्हणजे "भूमिपुत्र", ज्याचा महाराष्ट्र दौरा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. एका शोला सरासरी ७०० ते ८०० लोक उपस्थित असतात आणि तिकिटे BookMyShow वरून सहज बुक करता येतात.
प्रणित मोरे स्वतः सांगतो की प्रेक्षकांना जर एखादा जोक आवडला नाही तर तो लगेच स्क्रिप्टमधून काढून टाकतो.
प्रणित कोण आहे?
प्रणित मोरेने स्टँडअप कॉमेडियन म्हणून स्वतःची ओळख तयार केली आहे. तो आपल्या विनोद आणि कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जातो. इंस्टाग्रामपासून युट्यूबपर्यंत, प्रणितला त्याच्या व्हिडिओंसाठी खूप प्रेम मिळते. प्रणित मोरे हा विनोदी कलाकार तसेच आरजे आहे. त्याचे इंस्टाग्रामवर ४ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि युट्यूबवर १० लाखांपेक्षा जास्त सबस्क्राइबर्स आहेत.
प्रणित वादात अडकला होता
प्रणित मोरे काही वादांमध्येही अडकला होता. या वर्षी रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या स्काय फोर्स चित्रपटावर त्याने विनोद केला आणि तो वादात सापडला. त्याने वीर पहाडियाची खिल्ली उडवली होती, त्यानंतर त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले गेले. प्रणितचा हा वाद सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, वीर पहाडियाने प्रणितची माफी स्वीकारली आणि त्याने हे प्रकरण संपवले.
प्रणित मोरेचे आवडते शो हास्यजत्रा आणि चला हवा येवू द्या
त्याला 'हास्यजत्रा' शो खूप आवडतो आणि समीर चौगुले, तर चला हवा येवू द्या मधील कुशल बद्रिके आणि भाऊ कदम हे त्याचे आवडते कलाकार आहेत. सध्या प्रणित मोरे स्टॅन्डअप शोद्वारे महाराष्ट्रभर लोकांना हसवतो आहे आणि कॉमेडीच्या माध्यमातून लोकांशी आपलं नातं घट्ट करतो आहे.
बिग बॉस प्रथम ओटीटीवर दिसणार
आता शोमध्ये प्रणित बिग बॉसच्या घरात आपल्या विनोदाने प्रेक्षकांना किती हसवतो हे पाहणे मनोरंजक ठरेल. यावेळी बिग बॉस प्रथमच ओटीटीवर दिसणार आहे. हा शो दररोज रात्री ९ वाजता जिओ हॉटस्टारवर आणि रात्री 10:30 वाजता कलर्स टीव्हीवर प्रसारित होणार आहे.