Raja Shivaji Movie salman khan role  
मनोरंजन

Raja Shivaji Movie|''शिवाजी नाही... शिवाजी राजं म्हणायचं...'', सलमानच्या एका डायलॉगवर प्रेक्षकांच्या शिट्याच शिट्या.. (Video)

Raja Shivaji Movie| ''शिवाजी नाही... शिवाजी राजं म्हणायचं...'', डोक्यावर पगडी, हातात तलवार घेऊन सलमानचा राजा शिवाजी चित्रपटात थरार ... (Video)

स्वालिया न. शिकलगार

महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या ऐतिहासिक चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याच्या एका दमदार डायलॉगने थिएटरमध्ये अक्षरशः जल्लोषाचे वातावरण निर्माण केले आहे.

चित्रपटात सलमान खानने वीर जिवा महाले यांची भूमिका साकारली असून त्याचा कॅमिओ प्रेक्षकांना प्रचंड भावला आहे. डोळ्यात अंगार, डोक्यावर भगवा फेटा, भारदस्त आवाज अन्‌ दांडपट्ट्याचा जोर...या थरारक प्रसंगातील एक संवाद चाहत्यांची मने जिंकून घेतली आहे. चाहत्यांनी या डायलॉगवर शिट्ट्यांचा पाऊस पाडलाय. मुघल सैन्याला सळो की पळो करून सोडणारे जिवा महाले यांच्या भूमिकेत सलमान खान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संरक्षणासाठी जिवा महाले शौर्याने समोर येऊन त्या सैन्याला पराभूत करतात. हातात दांडपट्टा घेऊन समोरच्याला गार करतानाचा हा प्रसंग जशाचा तसा प्रेक्षकांच्या समोर उभारला.

''शिवाजी नाही... शिवाजी राजं म्हणायचं!''

यावेळी सलमान खानचा एक संवाद ऐकू येतो. ''शिवाजी नाही...शिवाजी राजं म्हणायचं...'' हा त्याचा संवाद पडद्यावर येताच सिनेमागृहात शिट्ट्या, टाळ्या आणि जल्लोष झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या संवादातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचा आदर व्यक्त झालाय. प्रेक्षकांनी या डायलॉगवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख यांचा हा महत्त्वाचा प्रोजेक्ट आधीपासूनच चर्चेत होता. रिलीजपूर्वीच चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी कमाई करत विक्रमाच्या दिशेने वाटचाल केली आहे.

सलमान खानचा सरप्राईज कॅमिओ, भव्य दृश्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा या अभिमान जागवणाऱ्या गोष्टीमुळे 'राजा शिवाजी' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटात सलमान खान मराठा लूकमध्ये दिसतो.

सलमानला ऑफर कशी झाली भूमिका?

सलमानला या चित्रपटात भूमिका कशी मिळाली, याबद्दलही बोलले जात आहे. याबद्दल रितेश देशमुखने यापूर्वीच खुलासा केला होता की, खुद्द सलमान खाननेच या चित्रपटाचाच भाग होण्याचा आग्रह धरला होता. मीडिया रिपोर्टनुसार, रितेश म्हणाला, "आम्ही नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एकत्र होतो. त्याने मला विचारले की, या चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू होईल? मी म्हणालो, 'ते याच महिन्यात सुरू होईल.' तेव्हा त्याने विचारले की, 'मी कोणती भूमिका साकारणार आहे? खरंतर, मी त्याला ही भूमिका आधी ऑफर केली नव्हती.'

रितेशने सलमानला सांगितले की, त्याला अशी माहिती मिळाली आहे की सलमानसाठी कोणतीही विशिष्ट भूमिका अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही, तेव्हा सलमान म्हणाला, "नाही, नाही, नाही...तू माझ्याशिवाय चित्रपट बनवूच शकत नाहीस; या चित्रपटात माझा सहभाग असायलाच हवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT