रिंकू राजगुरुच्या ‘आशा’ चित्रपटातील पहिले गाणं प्रदर्शित झाले असून ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. भावूक आणि सुंदर म्युझिक व्हिडिओने चाहत्यांची मने जिंकली असून चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
Rinku Rajguru new movie Asha song released
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु पुन्हा एकदा नवीन भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या आगामी ‘आशा’ या चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. रिंकूच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल आधीच उत्सुकता होती आणि नव्याने रिलीज झालेल्या या गाण्याने त्यात आणखी भर टाकली आहे.
या गाण्याची खासियत म्हणजे त्यातील भावूक प्रस्तुती, सूर आणि संगीताची साधी पण प्रभावी बांधणी. गाण्यात रिंकूची व्यक्तिरेखा तिच्या जीवनातील संघर्ष, स्वप्ने आणि आशावादी दृष्टिकोनाला सामोरी जाताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरून जाणवणारे भाव, गाण्यातील प्रत्येक ओळीशी प्रेक्षकांना जोडून ठेवतात. गाण्याच्या व्हिडिओत दाखवलेली लोकेशन्स, सिनेमॅटोग्राफी आणि कथा सांगण्याची शैलीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी आहे.
'चालत रहा पुढं... चालत रहा पुढं... ‘आशा’ चित्रपटाचे प्रेरणादायी गाणं नुकतेच प्रदर्शित झाले आहे. गीतकार वलय मुळगुंद तर संगीतकार आशिष झा असून प्राची केळकरने स्वरसाज दिला आहे. या गाण्यात संघर्षाची ठिणगी, आशेची ज्योत आणि प्रकाशाची नवी चाहूल आहे. मनाला उभारी देणारे हे गाणे केवळ ‘आशा’ सेविकेचे नाही तर प्रत्येक स्त्रीचे आहे.
आशामधील कलाकार
या चित्रपटात प्रमुख भूमिकेत रिंकू राजगुरू, सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
आशामधील हे गाणं म्हणजे प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे. ही केवळ आशा सेविकांची गोष्ट नाही, तर कुटुंबासाठी झगडणाऱ्या, स्वप्नांसाठी लढणाऱ्या आणि कोणत्याही संकटात न डगमगणाऱ्या प्रत्येक महिलेची प्रेरक धडाडी आहे.- दिपक पाटील, दिग्दर्शक
कधी रिलीज होणार 'आशा'
दिपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’चे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील निर्माते आहेत. तर मुरलीधर छतवानी आणि रवींद्र औटी सहनिर्माते आहेत. हा चित्रपट येत्या १९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.