Dhurandhar 2 OTT Release: रणवीर सिंहच्या बहुचर्चित ‘धुरंधर 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता हा चित्रपट OTT वर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, चित्रपटाच्या OTT रिलीजबाबत गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. कारण, आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाच्या रिलीजची घोषणा झाली होती, पण भारतातील प्रेक्षकांना तो नेमका कधी पाहायला मिळणार, याबाबत स्पष्टता नव्हती.
दरम्यान, Netflix ने आधीच ‘धुरंधर 2’च्या OTT रिलीजची तारीख जाहीर केली होती. परदेशातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट 15 मेपासून Netflix वर स्ट्रीम होत आहे. मात्र, भारतात हा चित्रपट JioHotstar वर प्रदर्शित होणार असला तरी त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नव्हती.
यामुळे सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी “भारतामध्ये रिलीज उशिरा का?” असा प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चांदरम्यान आता JioHotstar ने आपल्या X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना हिंट दिली आहे.
चित्रपटाची एक क्लिप शेअर करत JioHotstar ने लिहिले, “लेडीज अँड जेंटलमेन, तुम्ही यासाठी तयार आहात का?” तसेच व्हिडिओमध्ये “लवकरच मोठा धमाका होणार” असा संदेशही देण्यात आला आहे. मात्र, ‘धुरंधर 2’ नेमका कोणत्या तारखेला स्ट्रीम होणार, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे, OTT वर्जन थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या व्हर्जनपेक्षा वेगळा असणार आहे. निर्मात्यांनी याला ‘अनकट आणि रॉ व्हर्जन’ असं नाव दिलं आहे. थिएटरमध्ये काही दृश्यं कापण्यात आली होती, ती आता OTT वर्जनमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना अधिक विस्तृत अनुभव मिळण्याची शक्यता आहे.
रिपोर्ट्सनुसार, थिएटर वर्जन सुमारे 3 तास 49 मिनिटांचे होते, तर OTT वर्जन जवळपास 3 तास 52 मिनिटांचा असणार आहे. तसेच भारतातील OTT हक्कांसाठी JioHotstar ने तब्बल 150 कोटी रुपये मोजल्याची चर्चा आहे.
आता फक्त अधिकृत तारखेची घोषणा बाकी असून, रणवीर सिंहच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.