Ranveer Singh
पुढारी ऑनलाईन डेस्क : लडाखमधील लेह जिल्ह्यात रणवीर सिंगच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रीकरणाच्या सेटवर काम करणाऱ्या १२० जणांना रविवारी (दि.१९) रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.
अभिनेता रणवीर सिंग 'धुरंधर' या अॅक्शन चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. लेह जिल्ह्यातील पत्थर साहिब या भागात रविवारी (दि.१९) या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. यादरम्यान स्थानिक आचाऱ्याकडून ६०० जणांचे जेवण बनवून घेण्यात आले. यातील १२० जणांना या जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना डोकेदुखी, पोटदुखी, उलट्याचा त्रास सुरू झाल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच लेह पोलिसांसह अन्न-औषध प्रशासन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अन्न-औषध प्रशासन विभागाच्या आधिकाऱ्यांनी अन्नाचे नमुने घेत ते चाचणीसाठी पाठविले आहेत. त्यानंतर अन्न पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी सुरू करण्यात आली.
अन्नातून विषबाधा झाल्यानंतर १२० जणांची प्रकृती बिघडली. त्यावेळी रणवीर सिंग चित्रीकरणाच्या सेटवर उपस्थित होता. चित्रीकरण सुरू असल्याने त्याने जेवण केले नाही, त्यामुळे त्याला काहीच झाले नाही. या चित्रपटात संजय दत्त, आर माधवन, अर्जून रामपाल हेही अभिनेते असून ते चित्रीकरणावेळी त्या ठिकाणी नव्हते त्यामुळे ते यातून बचावले.