डॉन ३ चित्रपट वादात कलाकारांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था 'सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन' (सिंटा) देखील उतरली आहे. Pudhari
मनोरंजन

Don 3 controversy | "रणवीर सिंहने आमच्‍याशी ..." : 'डॉन 3' वादावर पूनम ढिल्लो यांनी स्पष्ट केली 'सिंटा'ची भूमिका

Don 3 controversy |वाद सोडवण्यासाठी रणवीर 'सिंटा'ची मदत घेऊ शकला असता

पुढारी वृत्तसेवा

Don 3 controversy

मुंबई : 'डॉन ३' (Don 3) मधून रणवीर सिंगच्या अचानक बाहेर पडण्यामुळे बॉलीवूडमध्‍येखळबळ उडाली आहे. अभिनेता रणवीर सिंग आणि 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज' (FWICE) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत असतानाच, आता कलाकारांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था 'सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन' (CINTAA - सिंटा) देखील या वादात उतरली आहे. 'सिंटा'च्या अध्यक्षा पूनम ढिल्लो यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली आहे.

'सिंटा'ला पूर्वकल्पना नाही

'व्हरायटी इंडिया'शी बोलताना पूनम ढिल्लो म्‍हणाल्‍या की, रणवीर हा 'सिंटा'चा सदस्य आहे, असे असूनही त्याच्याविरोधात "असहकाराचा आदेश" जारी करण्यापूर्वी कोणत्याही बाजूने 'सिंटा'शी सल्लामसलत केली नाही किंवा त्यांना पूर्वकल्पनाही दिली नाही.

आम्ही नेमके काय बोलावे या संभ्रमात

रणवीर सिंगने 'डॉन ३' सोडल्यामुळे निर्माती संस्था 'एक्सेल एंटरटेनमेंट'ला सुमारे ४५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच्या दावा केला जात आहे. मात्र, या सगळ्यात 'सिंटा'ला पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आल्याचे ढिल्लो यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, "एक असोसिएशन म्हणून 'सिंटा'ची इच्छा होती की, काही समस्या होती तर दोन्ही बाजूंच्या किंवा किमान एका बाजूच्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधायला हवा होता. परंतु, कलाकार, प्रॉडक्शन हाऊस किंवा फेडरेशन यांपैकी कोणाकडूनही आमच्याशी संपर्क साधला गेला नसल्यामुळे आम्ही नेमके काय बोलावे या संभ्रमात आहोत, कारण आमच्याकडे याबद्दल सविस्तर माहितीच नाही."

रणवीर सिंग 'सिंटा'ची मदत घेऊ शकला असता: पूनम ढिल्लो

संपूर्ण प्रकरणाची पूर्ण माहिती हाती नसल्यामुळे ढिल्लो यांनी घाईघाईने कोणत्याही निष्कर्षावर येणे टाळले. या प्रकरणी माझ्याकडे योग्य माहिती येत नाही, तोपर्यंत मी याबाबत माझे मत मांडू शकत नाही. आम्हाला या प्रकरणी केवळ प्रसार माध्‍यमांतूनच माहिती मिळालेली आहे. ही खूप विचित्र परिस्थिती आहे कारण यात अडकलेला कलाकार आमचा सदस्य आहे, पण तरीही कोणीही आम्‍हाला विश्‍वासत घेतलेले नाही. या असहकार आदेशामुळे रणवीरच्या करिअरला मोठा फटका बसू शकतो का? असे विचारले असता, ही संपूर्ण परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळली जाऊ शकली असती, असेही ढिल्लो यांनी स्‍पष्‍ट केले.

आम्ही हा वाद अधिक सामोपचाराने सोडवू शकलो असतो

"आम्ही हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करू शकलो असतो. आमची असोसिएशन यासाठीच आहे - कलाकार आणि निर्मात्यांमधील असे वाद किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी. रणवीर 'सिंटा'चा भाग असल्याने, त्याने आम्हाला यात सामील करून घ्यायला हवे होते आणि आमच्याशी संपर्क साधायला हवा होता; जेणेकरून आम्ही हा वाद अधिक सामोपचाराने सोडवू शकलो असतो."

कोण चुकीचे हेच माहित नाही...

प्रत्येक कलाकाराने दिलेले शब्द शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने पाळावेत, असे मला वाटते. जर काही अडचणी असतील, तर त्या त्यांनी योग्य रीतीने हाताळल्या पाहिजेत आणि गरज भासल्यास असोसिएशनशी संपर्क साधला पाहिजे, जेणेकरून आपण एकत्र मिळून त्यावर तोडगा काढू शकू. कारण वस्तुस्थिती अशी आहे की आम्हाला याबद्दल अजून जास्त काही माहिती नाही. त्यामुळे तो (रणवीर) चुकीचा आहे की ते (निर्माते/फेडरेशन) चुकीचे आहेत, हे मी सांगू शकत नाही. मला माहीत नाही, असेही 'सिंटा'च्या अध्यक्षा पूनम ढिल्लो यांनी स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT