Ranveer Allahabadia girlfriend who is Juhi Bhatt
मुंबई: यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट' वादानंतर रणवीरने आपल्या रिलेशनशिप स्टेटसबाबत मौन सोडले असून, त्याने जुही भट्टसोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात झालेल्या आयपीएल सामन्यादरम्यान हे दोघे एकत्र दिसले. त्याचे टीव्ही अभिनेत्री निक्की शर्मासोबत ब्रेकअप झाले होते. मात्र, त्याची ही नवीन गर्लफ्रेंड कोण आहे, जाणून घेऊया.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रणवीर आणि जुही 'ट्विनिंग' करताना दिसले. रणवीरने पांढरा टी-शर्ट आणि निळी जीन्स घातली होती, तर जुहीदेखील पांढऱ्या क्रॉप टॉप आणि डेनिममध्ये स्टायलिश दिसत होती. सुरुवातीला दोघांनी कॅमेऱ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, परंतु एका चाहत्याने सेल्फीसाठी विचारले असता रणवीरने, “मी सध्या माझ्या गर्लफ्रेंडसोबत आहे,” असे सांगत सेल्फी देण्यास नकार दिला. रणवीरच्या या विधानानंतर स्टेडियममधील त्यांचे फोटो व्हायरल झाले.
रणवीरची नवी गर्लफ्रेंड जुही भट्ट ही २९ वर्षांची प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे. मूळची उत्तराखंडच्या डेहराडूनची असलेल्या जुहीची डिजिटल विश्वात मोठी लोकप्रियता आहे. जुहीचे इंस्टाग्रामवर ४.५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती प्रामुख्याने फॅशन आणि लाइफस्टाइल संदर्भातील कंटेंट तयार करते. तिने 'तिरा' सारख्या मोठ्या ब्रँड्ससह आणि 'फिल्टरकॉपी' सारख्या नामांकित कंटेंट प्लॅटफॉर्मसोबत काम केले आहे.
रणवीरने आपल्या नात्याबाबत संकेत देण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी दिवाळीत त्याने काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये एक तरुणी 'घिबली' स्टाईल फिल्टरमध्ये दिसत होती. मात्र, त्यावेळी त्याने तिला टॅग न केल्याने तिची ओळख पटू शकली नव्हती. आता वानखेडेवरील या घटनेनंतर रणवीर आणि जुही रिलेशनशिपमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे.