Ranbir Kapoor Apology Pudhari
मनोरंजन

Ranbir Kapoor Apology: रणबीर कपूरच्या एका चुकीच्या शब्दामुळे वाद वाढला; माफीनाम्यानंतर आलिया भट्टची कृती चर्चेत

Ranbir Kapoor Apology: रणबीरच्या समर्थनार्थ शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टला आलिया भट्टने लाइक केल्याची चर्चा आहे.

Rahul Shelke

Ranbir Kapoor Apology: अभिनेता रणबीर कपूर सध्या आगामी ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, कोलकाता येथील एका कार्यक्रमात बोलताना त्याच्या तोंडून चुकून निघालेल्या एका शब्दामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला. या प्रकरणावर रणबीरने जाहीर माफी मागितली आहे. आता त्याची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्ट हिने केलेल्या एका कृतीमुळे या चर्चेला नवं वळण लागलं आहे.

नेमकं काय घडलं?

रणबीर कपूर २० ऑक्टोबर रोजी कोलकाता येथे दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी तो वाईटावर चांगल्याच्या विजयाबद्दल बोलत होता. मात्र, बोलण्याच्या ओघात त्याच्या तोंडून एक चुकीचा शब्द निघाला.

वाईट कितीही शक्तिशाली असलं, तरी शेवटी सत्य आणि चांगुलपणाचा विजय होतो, असं त्याला सांगायचं होतं. मात्र, बोलताना त्याने  ‘वाईट कितीही शक्तिशाली असलं, तरी शेवटी सत्य आणि चांगुलपणाचा अंत होईल,’ अशा अर्थाचं वाक्य बोलला. त्याच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रणबीर आगामी ‘रामायण’ चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका साकारत आहे. त्यामुळे त्याच्या या चुकीच्या शब्दप्रयोगावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. काहींनी त्याला ट्रोल केलं, तर काहींनी त्याच्या बोलण्यातील चुकीवरून विनोद केले. चित्रपटाच्या प्रचारादरम्यान अशा विषयांवर बोलताना अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं.

रणबीरने मागितली जाहीर माफी

या वक्तव्यावरून टीका सुरू झाल्यानंतर रणबीरने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. बोलताना आपली जीभ घसरल्याचं त्याने मान्य केलं. आपल्या बोलण्यामुळे चुकीचा अर्थ निघाल्याबद्दल त्याने दिलगिरी व्यक्त केली.

सत्य आणि चांगुलपणाचाच शेवटी विजय होतो, असं आपल्याला सांगायचं होतं, असं रणबीरने स्पष्ट केलं. यावेळी त्याने ‘रॉकस्टार’ चित्रपटातील गाण्याचाही संदर्भ दिला. ‘जो भी मैं कहना चाहूं, बर्बाद करे अल्फाज मेरे’ या ओळींचा उल्लेख करत त्याने चुकीच्या शब्दांमुळे आपला मुद्दा नीट मांडला गेला नसल्याचं सांगितलं.

आलिया भट्टने नेमकं काय केलं?

रणबीरच्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान आलिया भट्टच्या एका कृतीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रणबीरच्या समर्थनार्थ एका इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये रणबीरवर टीका करणाऱ्यांनी त्याची बाजू समजून घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं होतं.

या पोस्टला आलियाने लाइक केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे तिने या प्रकरणात रणबीरला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सोशल मीडियावर चर्चेला उधाण

रणबीरच्या एका चुकीच्या शब्दप्रयोगामुळे सुरू झालेली चर्चा आता त्याच्या माफीनाम्यापासून आलियाच्या प्रतिक्रियेपर्यंत पोहोचली आहे. रणबीरने आपली चूक मान्य करून स्पष्टीकरण दिलं असलं, तरी सोशल मीडियावर या विषयावर चर्चा सुरू आहे.

आलियाने पोस्ट लाइक केल्यामुळे तिने रणबीरला पाठिंबा दिल्याचं मानलं जात आहे. मात्र, केवळ पोस्ट लाइक केल्यावरून तिची नेमकी भूमिका काय आहे, याचा ठाम निष्कर्ष काढता येत नाही. सध्या रणबीरच्या वक्तव्यापेक्षा त्याच्या माफीनाम्याची आणि आलियाच्या या कृतीचीच चर्चा होताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT