Ramayana BO Collection Day 7 Pudhari
मनोरंजन

Ramayana BO Collection Day 7: धुरंधर, पुष्पा, बाहुबली अन् जवानला मागे टाकत ‘रामायण’ने रचला इतिहास; सात दिवसांत किती कोटी कमावले?

Ramayana Box Office Collection Day 7: रणबीर कपूर आणि यश यांच्या ‘रामायण’ चित्रपटाने सात दिवसांत जगभरात ९३४.५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Rahul Shelke

Ramayana Box Office Collection Day 7: रणबीर कपूर आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन सात दिवस झाले असले, तरी त्याची कमाई थांबण्याचे नाव घेत नाही. दिवाळीच्या काळात अपेक्षेइतकी कमाई झाली नसली, तरी सण संपल्यानंतर चित्रपटाच्या व्यवसायात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘रामायण’ने सातव्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल ७०.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या दिवशी चित्रपटाचे एकूण २४,२३९ शो झाले. तर चित्रपटाची प्रेक्षकांची उपस्थिती ४३.४ टक्के होती. सात दिवसांतील या दमदार कमाईमुळे चित्रपटाने भारतात ५११.१० कोटी रुपयांच्या नेट कलेक्शनचा आकडा पार केला आहे. तर ग्रॉस कलेक्शन ६११.०५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

सातव्या दिवशी कोणत्या भाषेत किती कमाई?

‘रामायण’ चित्रपटाला हिंदी भाषेत सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. सातव्या दिवशी चित्रपटाने हिंदीतून ५८ कोटी रुपयांची कमाई केली. हिंदीतील एकूण १९,७१५ शोमध्ये प्रेक्षकांची उपस्थिती ४३ टक्क्यांहून अधिक होती.

इतर भाषांमधील कमाई पाहिली तर कन्नडमध्ये ४.५० कोटी रुपये, मल्याळममध्ये २.७५ कोटी रुपये, तेलुगूमध्ये २.७५ कोटी रुपये आणि तमिळमध्ये २.६५ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे.

सर्व भाषांमधील कमाईचा विचार करता सातव्या दिवशी चित्रपटाने भारतात एकूण ७०.६५ कोटी रुपये कमावले आहेत. विशेष म्हणजे, हिंदीसोबतच दक्षिण भारतीय भाषांमध्येही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

१००० कोटींच्या क्लबमध्ये जाणार?

भारतातच नव्हे, तर परदेशातही ‘रामायण’ची घोडदौड सुरू आहे. परदेशातील कमाईमुळे चित्रपटाच्या एकूण व्यवसायात मोठी भर पडली आहे. सातव्या दिवशी चित्रपटाने परदेशातून २५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे परदेशातील एकूण कमाईचा आकडा ३२३.५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

आता चित्रपटाच्या जगभरातील कमाईचा आकडा ९३४.५५ कोटी रुपये झाला आहे. म्हणजेच १००० कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यासाठी चित्रपटाला आणखी ६५.४५ कोटी रुपयांची कमाई करावी लागणार आहे.

सध्याचा कमाईचा वेग पाहता हा टप्पा गाठण्यासाठी चित्रपटाला फार वेळ लागणार नाही. आठव्या दिवशीही चित्रपटाने दमदार कामगिरी केली, तर लवकरच ‘रामायण’ १००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करू शकतो.

सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘रामायण’

हिंदी चित्रपटांच्या सातव्या दिवसाच्या कमाईचा विचार केला, तर रणबीर कपूरच्या ‘रामायण’ने सर्वांनाच मागे टाकले आहे. या चित्रपटाने सातव्या दिवशी हिंदीतून ५८ कोटी रुपयांची कमाई करत पहिला क्रमांक पटकावला आहे.

या यादीत रणवीर सिंहच्या ‘धुरंधर २’ने दुसरे स्थान मिळवले आहे. तर ‘रामायण’च्या तुलनेत ‘पुष्पा २’, ‘वॉर’, ‘बाहुबली २’, ‘ॲनिमल’, ‘जवान’ आणि ‘पठाण’ हे चित्रपट मागे पडले आहेत.

एकीकडे रणबीर कपूरचा दमदार अभिनय आणि दुसरीकडे यशची लोकप्रियता यामुळे चित्रपटाला मोठा फायदा होताना दिसत आहे. आता सर्वांचे लक्ष चित्रपटाच्या आठव्या दिवसाच्या कमाईकडे लागले आहे. ‘रामायण’ १००० कोटींचा टप्पा किती लवकर पार करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT