Ramayana Box Office Collection Day 2 Pudhari
मनोरंजन

Ramayana Box Office Collection Day 2: दिवाळीत ‘रामायण’ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास; दोन दिवसांत किती कोटी कमावले?

Ramayana Box Office Collection Day 2: नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या दोन दिवसांत जगभरात २२१.०५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Rahul Shelke

Ramayana Box Office Collection Day 2: नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण : राइज ऑफ अ लिजेंड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने जगभरातील कमाईचा २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

‘सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने शुक्रवारी भारतात ४८.०५ कोटी रुपयांची नेट कमाई केली. तर परदेशातील कमाई ३५ कोटी रुपये झाली. त्यामुळे दोन दिवसांतील चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई २२१.०५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत २०० कोटींचा टप्पा गाठणाऱ्या चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले आहे. यापूर्वी ‘पठाण’, ‘आरआरआर’, ‘पुष्पा २’, ‘जेलर २’ आणि ‘धुरंधर २’ यांसारख्या चित्रपटांनीही कमी कालावधीत जगभरात मोठी कमाई केली होती.

हिंदी प्रेक्षकांचा चित्रपटाला मोठा प्रतिसाद

भारतातील कमाईचा विचार केला तर ‘रामायण’ला सर्वाधिक प्रतिसाद हिंदी भाषेतून मिळत आहे. दुसऱ्या दिवशी हिंदी आवृत्तीच्या १९,८५९ शोमधून ३५.५० कोटी रुपयांची नेट कमाई झाली. कन्नड आवृत्तीने ५.१५ कोटी, तेलुगू आवृत्तीने ४.७५ कोटी, तमिळ आवृत्तीने १.५० कोटी आणि मल्याळम आवृत्तीने १.१५ कोटी रुपयांची कमाई केली.

पहिल्या दोन दिवसांत भारतात चित्रपटाची एकूण ग्रॉस कमाई १३४.८० कोटी रुपये झाली आहे. तर नेट कमाई ११२.९० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

परदेशातही ‘रामायण’ची जादू

या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. भारताची संस्कृती आणि इतिहास जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणून चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. त्याचा फायदा आता बॉक्स ऑफिसवर होताना दिसत आहे.

पहिल्या दोन दिवसांत परदेशातील बाजारपेठेतून चित्रपटाने तब्बल ८६.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतातील कमाईच्या तुलनेत परदेशातील प्रतिसादही चांगला असल्याचे या आकडेवारीवरून दिसते. दिवाळीचा सण आणि सुट्ट्यांचा काळ अद्याप सुरूच असल्याने आगामी दिवसांत कमाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, दिवाळीपूर्वी चित्रपट प्रदर्शित करण्याच्या निर्णयाबाबत सुरुवातीला काही विश्लेषकांनी चिंता व्यक्त केली होती. कारण दिवाळीच्या काळात मोठ्या चित्रपटांना सहसा सणानंतर अधिक प्रेक्षक मिळतात. पूजा आणि सणाचे कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर कुटुंबे चित्रपट पाहण्यासाठी बाहेर पडतात. मात्र, ‘रामायण’ने दिवाळीपूर्वीच बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात करून ही चिंता काही प्रमाणात दूर केली आहे.

वीकेंडमध्ये ५०० कोटींचे लक्ष्य

दोन दिवसांत २२१ कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर आता ‘रामायण : राइज ऑफ अ लिजेंड’ या चित्रपटाचे लक्ष्य जगभरात ५०० कोटी रुपयांची कमाई करण्याचे आहे. दिवाळीच्या वीकेंडपर्यंत हा टप्पा गाठण्याची निर्मात्यांना अपेक्षा आहे.

चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून समीक्षकांकडूनही बहुतांश सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. त्यामुळे आगामी दिवसांत चित्रपटाच्या कमाईत किती वाढ होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशी आहे चित्रपटाची स्टारकास्ट

नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस आणि यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रणबीर कपूरने प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली आहे. साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. रवी दुबेने लक्ष्मणाची भूमिका साकारली आहे.

याशिवाय लारा दत्ता, रकुल प्रीत, विवेक ओबेरॉय, काजल अग्रवाल, सौरभ सचदेवा, आदिनाथ कोठारे, अरुण गोविल, इंदिरा कृष्णन, अनुपम खेर, कुणाल कपूर आणि सनी देओल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सनी देओल प्रभू हनुमानांच्या भूमिकेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT