Ramayana Advance Booking Pudhari
मनोरंजन

Ramayana Advance Booking: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर धमाका होणार; ‘रामायण’च्या तिकिटांचे दर गगनाला भिडले, आगाऊ बुकिंगमधून किती कोटी कमावले?

Ramayana Advance Booking: मुंबईतील PVR ICON: Phoenix Palladium येथे काही IMAX 3D शोसाठी रिक्लायनर सीटचे तिकीट तब्बल २,७७० रुपये ठेवण्यात आले आहे.

Rahul Shelke

Ramayana Advance Booking: रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शनाच्या १५ दिवस आधीच सिनेमाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. बुकिंग सुरू होताच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या सिनेमाने अवघ्या काही तासांत कोट्यवधी रुपयांची आगाऊ कमाई केली आहे. दुसरीकडे, मुंबईतील काही चित्रपटगृहांमध्ये खास रिक्लायनर सीट्सचे दर थेट २,७७० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे ‘रामायण’च्या कमाईसोबतच तिकिटांच्या किमतींचीही चर्चा रंगली आहे.

‘रामायण’ची ८५ हजार तिकिटांची विक्री

आज सकाळी ८ वाजेपर्यंत ‘रामायण’ सिनेमाची देशभरात ८४,९६९ तिकिटे विकली गेली होती. आगाऊ बुकिंग सुरू झाल्यानंतर एका दिवसापेक्षाही कमी वेळात सिनेमाने १०४ शहरांमधून ४.८८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यात ब्लॉक बुकिंगचाही समावेश आहे. ब्लॉक बुकिंग वगळल्यास सिनेमाची आगाऊ कमाई ३.०५ कोटी रुपये आहे.

भाषेनुसार विचार केला, तर हिंदी आवृत्तीला सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. हिंदीमधून सुमारे ४.६२ कोटी रुपयांची आगाऊ कमाई झाली आहे. एकूण आगाऊ कमाईच्या जवळपास ९५ टक्के वाटा हिंदी आवृत्तीचा आहे. याशिवाय कन्नड भाषेतील डब केलेल्या आवृत्तीला २४.९२ लाख रुपयांची कमाई झाली आहे. तेलुगू आवृत्तीमधून ४७,४०० रुपयांची कमाई झाली आहे.

या सिनेमात रणबीर कपूर भगवान श्रीरामांची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर ‘KGF’ फेम अभिनेता यश रावणाची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे या सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

एका तिकिटासाठी मोजावे लागणार २,७७० रुपये!

‘रामायण’च्या आगाऊ बुकिंगमध्ये दिल्ली-एनसीआर भाग आघाडीवर आहे. या भागातून १८,६७४ तिकिटांच्या विक्रीतून १.४२ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो. मुंबईत १४,८२३ तिकिटांच्या विक्रीतून १.०१ कोटी रुपये मिळाले आहेत.

इतर शहरांमधील आकडेवारी पाहिली, तर पुण्यात ४,२०० तिकिटांच्या विक्रीतून २७.३६ लाख रुपये, कोलकातामध्ये ४,०९२ तिकिटांतून २२.०३ लाख रुपये आणि बंगळुरूमध्ये ४,१०५ तिकिटांतून १९.१८ लाख रुपयांची कमाई झाली आहे.

मात्र, मुंबईतील तिकिटांच्या किमतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. BookMyShow वर ‘नमित मल्होत्राज रामायण’ या नावाने सिनेमाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील लोअर परळ येथील PVR ICON: Phoenix Palladium या चित्रपटगृहात ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.५५ वाजता आणि रात्री ११ वाजता असलेल्या IMAX 3D शोसाठी रिक्लायनर सीटचे तिकीट २,७७० रुपये ठेवण्यात आले आहे.

मुंबईतील शोच्या वेळाही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. वडाळा येथील Miraj Cinemas: IMAX मध्ये सकाळी ६.४५ वाजता पहिला शो आहे. तर वांद्रे-कुर्ला संकुलातील Maison INOX: Jio World Plaza येथे रात्री ११.४५ वाजता शेवटचा शो आहे.

‘रामायण’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला उशीर का झाला?

‘रामायण’च्या निर्मात्यांनी सोमवारी दसऱ्याच्या निमित्ताने मंगळवारी आगाऊ बुकिंग सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, मंगळवारी सकाळी सुरुवातीला काही मोजक्याच शोसाठी बुकिंग सुरू झाले. वितरक आणि चित्रपटगृह चालकांमध्ये कमाईच्या वाट्यावरून मतभेद झाल्याची चर्चा होती.

नवीन सिनेमाच्या प्रदर्शनानंतर पहिल्या तीन आठवड्यांमध्ये वितरकांना मिळणारा हिस्सा साधारणपणे अनुक्रमे ५२.५ टक्के, ४५ टक्के आणि ३७.५ टक्के असतो. मात्र, ‘रामायण’सारख्या मोठ्या बजेटच्या आणि प्रचंड चर्चा असलेल्या सिनेमासाठी धर्मा प्रॉडक्शन्सने अधिक हिस्सा मागितल्याची माहिती आहे.

पहिल्या आठवड्यासाठी ६० टक्के, दुसऱ्या आठवड्यासाठी ५० टक्के आणि तिसऱ्या आठवड्यासाठी ४० टक्के हिस्सा मिळावा, अशी मागणी केल्याचे सांगितले जात आहे. याच कारणामुळे बुकिंग सुरू होण्यास उशीर झाल्याची चर्चा होती.

धर्मा प्रॉडक्शन्सने याच वर्षाच्या सुरुवातीला ‘रामायण’च्या दोन्ही भागांचे संपूर्ण भारतातील वितरण हक्क २५० कोटी रुपयांमध्ये घेतल्याची माहिती आहे.

यशच्या ‘रावण तांडव’चा व्हिडीओ प्रदर्शित

दसऱ्याच्या दिवशी ‘रामायण’च्या निर्मात्यांनी यशच्या रावणाच्या भूमिकेतील खास व्हिडीओ प्रदर्शित केला. ‘रावण तांडव’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओमध्ये रावणाच्या व्यक्तिमत्त्वाची आणि त्याच्या प्रवासाची झलक दाखवण्यात आली आहे. हिंदी आवृत्तीला ‘Rise of Asura’ असे नाव देण्यात आले आहे.

भगवान शंकरांना समर्पित तांडव स्तोत्राच्या पार्श्वभूमीवर रावणाच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू या व्हिडीओतून दाखवण्यात आले आहेत. हिंदी आवृत्तीला विशाल ददलानी यांनी आवाज दिला आहे, तर त्याचे बोल कुमार विश्वास यांनी लिहिले आहेत.

तमिळ आवृत्तीत अनिरुद्ध रविचंदर आणि जी. व्ही. प्रकाश कुमार यांचा आवाज असणार आहे. संगीताच्या देखरेखीची जबाबदारी संगीतकार ए. आर. रहमान यांचा मुलगा ए. आर. अमीन आणि हिरल विराडिया यांनी सांभाळली आहे.

या व्हिडीओच्या प्रदर्शनानंतर देशभरातील चित्रपटगृहांमध्ये ‘रामायण’च्या आगाऊ बुकिंगला सुरुवात झाल्याची घोषणा निर्मात्यांनी केली.

आता सर्वांचे लक्ष ‘रामायण’च्या कमाईकडे

रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांसारख्या लोकप्रिय कलाकारांमुळे ‘रामायण’कडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. सिनेमाच्या प्रदर्शनाला अद्याप बराच वेळ असतानाच आगाऊ बुकिंगमधून ४.८८ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. तिकिटांचे वाढलेले दर आणि प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद यामुळे या सिनेमाची चर्चा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT