Rajpal Yadav Cheque Bounce Case Pudhari
मनोरंजन

Rajpal Yadav: अभिनेता राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Rajpal Yadav Cheque Bounce Case: चेक बाऊन्सच्या सात प्रकरणांमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेता राजपाल यादव यांना तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Rajpal Yadav Cheque Bounce Case: बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने सात चेक बाऊन्स प्रकरणांमध्ये त्याला दोषी ठरवत तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

प्रत्येक प्रकरणात नुकसानभरपाईचे आदेश

न्यायालयाने राजपाल यादवला प्रत्येक प्रकरणात तक्रारदाराला 1.05 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, तक्रारदाराला अतिरिक्त 1.04 लाख रुपये आणि 75 हजार रुपये, तसेच राज्य सरकारला 25 हजार रुपये भरण्याचे निर्देशही दिले आहेत.

तसेच, अभिनेता राजपाल यादव यांच्या पत्नी राधा यादव यांनाही प्रत्येक प्रकरणात 5 लाख 51 हजार 380 रुपये तक्रारदाराला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

हे प्रकरण M/s Murli Projects Private Limited या कंपनीने दाखल केलेल्या तक्रारीशी संबंधित आहे. कंपनीने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्टच्या कलम 138 अंतर्गत चेक बाऊन्स झाल्याची तक्रार न्यायालयात दाखल केली होती.

यापूर्वीही झाली होती शिक्षा

मे 2024 मध्ये सत्र न्यायालयाने राजपाल यादवला दोषी ठरवत सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्याने दिल्ली उच्च न्यायालयात अपील केले होते. अपीलदरम्यान राजपाल यादवच्या वकिलांनी तडजोडीचे आश्वासन दिल्यानंतर उच्च न्यायालयाने शिक्षा तात्पुरती स्थगित केली आणि प्रकरण मध्यस्थीकडे पाठवले होते.

वारंवार दिलेलं आश्वासन पाळलं नाही

न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना म्हटले की, राजपाल यादव यांनी तक्रारदाराला 2.5 कोटी रुपये हप्त्यांमध्ये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अनेक संधी देऊनही त्यांनी ते पूर्ण केले नाही.

यामुळे फेब्रुवारी 2026 मध्ये न्यायालयाने त्यांना शरण येण्याचे आदेश दिले. आणखी वेळ देण्याची त्यांची विनंतीही फेटाळण्यात आली. त्यानंतर 5 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी आत्मसमर्पण (Surrender) केले.

नंतर मिळाला अंतरिम दिलासा

त्यानंतर राजपाल यादव यांनी 1.5 कोटी रुपये तक्रारदाराकडे जमा केल्यानंतर न्यायालयाने त्यांना अंतरिम स्वरूपात शिक्षेपासून काहीसा दिलासा दिला होता.

मात्र, आता दिल्ली उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय देत शिक्षा कायम ठेवली असून, तीन महिन्यांच्या साध्या कारावासासह नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT