‘राज’ हा चित्रपट आणि त्यातील मालिनी शर्माला प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या या हॉरर-सस्पेन्स चित्रपटात एका आत्म्याची भूमिका साकारून मालिनी रातोरात लोकप्रिय झाली होती. मात्र या यशानंतर तिने अचानक बॉलिवूडपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आता तब्बल 23 वर्षांनंतर त्या पुन्हा चाहत्यांच्या संपर्कात आली असून, महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरात त्या अगदी वेगळं आयुष्य जगत आहेत.
मॉडेलिंगपासून झाली करिअरची सुरुवात
मालिनीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली. त्या काळातील लोकप्रिय म्युझिक अल्बम्समुळे तिला घराघरात ओळख मिळाली. बॉम्बे वायकिंग्सच्या ‘क्या सूरत है’ आणि मीका सिंह यांच्या ‘सावन में लग गई आग’ या गाण्यांमध्ये ती दिसली होती. तिच्या या म्युझिक व्हिडीओंना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.
यानंतर तिने छोट्या पडद्यावरही काम केलं. 2000च्या दशकातील लोकप्रिय टीव्ही शो ‘कॅट्स’मध्ये त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या शोमध्ये नफीसा जोसेफ आणि कुलजीत रंधावा यांसारख्या अभिनेत्रीही होत्या. मॉडेलिंग आणि टीव्हीवरील कामामुळे मालिनी यांच्यासाठी सिनेमाची दारं खुली झाली.
‘राज’ चित्रपटाने बदललं आयुष्य
विक्रम भट्ट यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘राज’ हा चित्रपट 2002 मध्ये प्रदर्शित झाला आणि मालिनीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. बिपाशा बसू आणि डिनो मोरिया यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात मालिनीने एका आत्म्याची भूमिका साकारली होती. मालिनीचा पडद्यावरील वावर आणि अभिनय प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. तिच्यावर चित्रित झालेलं ‘आपके प्यार में’ हे गाणंही प्रचंड गाजलं. आजही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. याच काळात तिच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठा बदल झाला. तिने ‘तुम बिन’ फेम अभिनेता प्रियांशु चटर्जीशी लग्न केलं. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि पुढे दोघांचा घटस्फोट झाला.
ग्लॅमरच्या दुनियेला गुडबॉय
‘राज’च्या यशानंतर मालिनीकडे कामाच्या अनेक संधी होत्या. मात्र तिने अभिनय क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. काही वर्षे मॉडेलिंग आणि अभिनय केल्यानंतर तिने उत्पादन आणि क्रिएटिव्ह कामाकडे लक्ष वळवलं. हळूहळू तिने मनोरंजन क्षेत्रापासून स्वतःला पूर्णपणे दूर केलं आणि मुंबईच्या धावपळीऐवजी शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यातील जीवन निवडलं.
‘द स्लो लोकल’मधून नवी वाट
मालिनीने पर्यावरण, हस्तकला आणि नैसर्गिक जीवनशैलीशी संबंधित काम सुरू केलं. ‘द स्लो लोकल’ नावाचा उपक्रम सुरू करून या माध्यमातून घरगुती खाद्यपदार्थ, हस्तनिर्मित वस्तू, विविध प्रकारच्या कार्यशाळा आयोजित केल्या जात होत्या. घरच्या घरी तयार केलेली ब्रेड, कॉफी, पीनट बटर, नैसर्गिक तेलं, जॅम आणि ग्रॅनोलासारख्या वस्तूंची निर्मिती केली जात होती. त्याचबरोबर मुलं आणि मोठ्यांसाठी मातीची भांडी बनवणं, झाडांची निगा राखणं आणि क्रोशे यांसारख्या उपक्रमांच्या कार्यशाळाही घेतल्या जात होत्या.
सह्याद्रीच्या कुशीत उभारलं फार्मस्टे
शहरातील हा उपक्रम पुढे निसर्गाच्या अधिक जवळ नेण्याचा निर्णय मालिनीने घेतला. 2020 च्या आसपास ती पुण्यापासून जवळपास दोन तासांच्या अंतरावर असलेल्या सह्याद्रीच्या परिसरात जाऊन राहू लागली. तिथे तिने स्वतःचं फार्मस्टे उभारलं. आज स्वतःच्या जमिनीवर भाजीपाला पिकवणे आणि फार्मस्टेवर येणाऱ्या पाहुण्यांसाठी ताजे आणि सेंद्रिय अन्न तयार करणे.
२३ वर्षांनी व्हिडिओ समोर
दीर्घकाळ प्रसिद्धी आणि कॅमेऱ्यांपासून दूर राहिल्यानंतर मालिनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी पुन्हा संवाद साधायला सुरुवात केली. ‘द स्लो लोकल डायरीज’ नावाची डिजिटल सीरिज सुरू केली. ज्यात फार्मस्टेमधील दैनंदिन आयुष्य आणि निसर्गाशी संबंधित अनुभव ती शेअर करते. व्हिडिओमध्ये मेकअप न करता अगदी साध्या वेषात ती दिसली. विशेष म्हणजे एका व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर ‘राज’मधील ‘आपके प्यार में’ हेच गाणं ऐकायला मिळालं. त्यामुळे जुन्या चाहत्यांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. काही चाहत्यांनी कमेंट करत त्या ‘राज’मधील मालिनी शर्मा आहे का, असा प्रश्नही विचारला. यावर त्यांनी अगदी साधेपणाने होकार देत आपली ओळख स्पष्ट केली.