Punha Shivajiraje Bhosale Teaser Out Now
मुंबई – ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या बहुचर्चित चित्रपट भेटीला येण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. स्वराज्याचा गजर पुन्हा मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार असून या चित्रपटाचा नवा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. 'स्वराज्याचा हुंकारच जणू' असा अनुभव हा टीझर पाहिल्यानंतर येईल. सोशल मीडियावर हा टीझर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
निर्मात्यांनी हा चित्रपट यावर्षी ३१ ऑक्टोबरला रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे. या नव्या टीझरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांची दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेसाठी केलेला अथक संघर्ष अधोरेखित केला आहे.
महेश मांजरेकर यांनी इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं होतं की, ''महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी... राजे येतायत! आगमनाची तारीख कळणार १ ऑक्टोबरला, नवमीच्या शुभ मुहूर्तावर! झी स्टुडिओज् प्रस्तुत आणि द ग्रेट मराठा एंटरटेनमेंट, सत्य-सई फिल्म्स & क्रिझोल्ह फिल्म्झ निर्मित “पुन्हा शिवाजीराजे भोसले” याजसाठी केला होता अट्टहास..टीझर येतोय लवकरच!''
''महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी... राजे येतायत! स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत!’’या दमदार घोषणेनंतर सर्वांचे लक्ष चित्रपटाकडे लागून राहिले आहे. महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित चित्रपट रिलीज होऊ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
या चित्रपटाचा टिझर एका सोहळ्यात रिलीज करण्यात आला. या चित्रपटात सिद्धार्थ बोडके हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत आहे. सोबतीला विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, रोहित माने, नित्यश्री, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप अशी कलाकारांची तगडी फौज आहे. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. नुकताच त्रिशा ठोसरला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. पटकथा महेश मांजरेकर यांची असून संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांचे आहे. निर्मिती राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांची आहे.
दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले की, ''दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, “माझ्यासाठी हा चित्रपट म्हणजे आजच्या समाजाशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांनी फक्त स्वराज्य निर्माण झालं नाही, तर संपूर्ण जनमानस जागृत झालं. आजच्या पिढीसमोर उभ्या असलेल्या प्रश्नांना पाहताना, त्या विचारांचा प्रकाश पडद्यावर आणणं आवश्यक वाटतं. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट इतिहासाची गाथा सांगणारा असेलच, पण त्याचबरोबर वर्तमानाला प्रश्न विचारणारा, समाजाला जागवणारा आणि त्याला दिशा दाखवणारा ठरेल. कलाकार म्हणून मी शांत बसू शकत नाही; हा सिनेमा माझ्या अस्वस्थतेचा, माझ्या जिव्हाळ्याचा आणि माझ्या अंतःकरणाचा आवाज आहे.''