मनोरंजन

प्रसाद खांडेकर विनोदवीरांना घेऊन येतोय ‘एकदा येऊन तर बघा’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या सोशल मीडियावर 'दिखा दूंगा' हा ट्रेंड चांगलाच गाजतोय. याच धर्तीवर मराठीत 'एकदा येऊन तर बघा' हा नवा ट्रेंड नोव्हेंबर मध्ये येणार असल्याची चर्चा सुरु आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेलच हा नवा ट्रेंड कोण आणतंय? 'एकदा येऊन तर बघा' असं म्हणत, लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर मातब्बर विनोदवीरांना घेऊन २४ नोव्हेंबरला खास चित्रपटरुपी भेट प्रेक्षकांना देणार आहेत.

विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर यांची आहे.

'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाची कथा अजून गुलदस्त्यात असली तरी, विनोदाची वेगवेगळी शैली असणाऱ्या भन्नाट विनोदी कलाकार मंडळींच्या एकत्र येण्याने हास्याचे जबरदस्त स्फोट घडतील हे नक्की. गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार, आदी चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज प्रेक्षकांना खदखदून हसवणार आहे.

'एकदा येऊन तर बघा' प्रेक्षकांसाठी धमाल मनोरंजनाची ट्रीट असणार आहे. सात दिग्गज दिग्दर्शकांच्या घोषित झालेल्या सात मराठी चित्रपटांच्या शृंखलेतील ही दुसरी चित्रपट कलाकृती आहे. या आधीच्या 'अफलातून' या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभला होता.

'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाची कथा परितोष पेंटर यांची असून पटकथा, संवाद प्रसाद खांडेकर यांचे आहेत. गीते मंदार चोळकर यांची असून रोहन-रोहन, कश्यप सोमपुरा यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन योगेश कोळी तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. कार्यकारी निर्माते मनोज अवाना तर लाईन प्रोड्युसर मंगेश जगताप आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT