Pooja Pawar salunkhe new tv serial
मुंबई - मराठी प्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार-साळुंखे लवकरच स्टार प्रवाहच्या हळद रुसली कुंकू हसली मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत त्या राजकारणी बाळजाबाईच्या भूमिकेत दिसणार आहेत. बाळजाबाईचा गावात प्रचंड दबदबा आहे. वरकरणी अत्यंत प्रेमळ भासत असली तरी कमालीची सत्तालोलुप आणि पाताळयंत्री आहे. तिचं ध्येय साध्य करण्यासाठी ती काहीही करु शकते. घर आणि गावाची सगळी सूत्रे तिच्या हातात आहेत.
गावची सरपंच पदाची निवडणूक जिंकण्याचं तिचं ध्येय आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी ती आपला मुलगा दुष्यंत आणि गावातील सर्वसामान्य शेतकरी मुलगी कृष्णाचं लग्न करुन देण्यासही तयार होते.
बाळजाबाईची ही भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्री पूजा पवार – साळुंखे यांनी आई कुठे काय करते मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. जवळपास तीन वर्षांनंतर त्या पुन्हा एकदा या वाहिनीच्या मालिकेतून भेटीला येणार आहेत. बाळजाबाई या भूमिकेबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, ‘या मालिकेत मी खलनायिका साकारते आहे.
एक अभिनेत्री म्हणून खलनायिका साकारताना कस लागतो. बाळजाबाई हे अत्यंत प्रभावशाली असं पात्र आहे. दोन मुखवटे घेऊन वावरणारी. म्हणजे समाजात वावरताना ती जितकी नम्रपणे वागते तितकीच ती धूर्त आहे. बाळजाबाईचं वागणं, बोलणं, तिचं रहाणीमान या सगळ्या गोष्टी हळूहळू आत्मसात करतेय. बाळजाबाई हे पात्र प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे. नवी मालिका हळद रुसली कुंकू हसलं ७ जुलैपासून दुपारी १ वाजता पाहता येणार आहे.’