Panchayat Season 5: टीव्हीएफची लोकप्रिय वेबसीरिज ‘पंचायत’ सध्या तिच्या पाचव्या सीजनमुळे चर्चेत आहे. या सीजनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या दरम्यान पंचायत सीरिज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
यावेळी चर्चेचे कारण सीरिजचा ट्रेलर नसून शूटिंगनंतर गावात पसरलेली अस्वच्छता आहे. एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने गावातील परिस्थिती दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर नवी चर्चा सुरू झाली आहे.
शूटिंग संपल्यानंतर गावात कचरा आणि अस्वच्छता
शिवम चौधरी नावाच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने गावातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये गावातील वेगवेगळ्या ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता पसरल्याचे दिसत आहे. पंचायत सीरिजचे शूटिंग संपल्यानंतर गावाची अशी अवस्था झाल्याचा दावा त्याने केला आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना शिवमने, 'पंचायतचे शूटिंग संपले. पण मागे काय सोडून गेले?' अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्याच्या या पोस्टनंतर सोशल मीडिया युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मीडियावर युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया
या व्हिडिओवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने गंमतीशीर प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'मंजू देवींच्या राज्यात असे झाले नसते. आता बनराकसला मत द्या.' तर दुसऱ्या एका युजरने थेट 'द व्हायरल फीव्हर'ला टॅग करत, 'तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती,' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, काही सोशल मीडिया युजर्सनी हा व्हिडिओ जुना असल्याचा दावाही केला. त्यावर व्हिडिओ शेअर करणाऱ्या शिवम चौधरीने हा व्हिडिओ 24 नोव्हेंबर 2026 रोजीचा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या व्हिडिओवरून सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.
4 डिसेंबरला प्रदर्शित होणार पंचायतचा पाचवा सीजन
दुसरीकडे, पंचायतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या लोकप्रिय सीरिजचा पाचवा सीजन 4 डिसेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरवरून यंदाच्या सीजनमध्ये सचिव जी आणि रिंकी यांचं लग्न होणार असल्याचं दिसतं आहे.
ट्रेलरमध्ये सचिव जी रिंकीशी लग्नाची मागणी घालण्यासाठी प्रधानजींच्या घरी जाणार असल्याचं दिसतयं. त्यामुळे या दोघांचे नाते यंदाच्या सीजनमध्ये पुढे जाणार का, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
विशेष म्हणजे, सचिव जी आणि रिंकी यांचे लग्न पाचव्या सीजनमध्ये होणार की त्यासाठी चाहत्यांना सहाव्या सीजनची वाट पाहावी लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे एकीकडे नव्या सीजनची उत्सुकता वाढली असताना दुसरीकडे शूटिंगनंतर गावात पसरलेल्या अस्वच्छतेचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.