पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध संगीतकार ए.आर रहमान आणि बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टसोबतच्या 'हायवे' चित्रपटात काम केलेली पाकिस्तानी संगीतकार हानिया अस्लम हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हानिया यांनी रविवारी (दि. ११ ऑगस्ट ) रोजी या जगाचा निरोप घेतला. याबद्दलची माहिती चुलत बहीण झेब बंगश यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे दिली आहे. यानंतर बॉलिवूड अभिनेता आमिर खानची पत्नी किरण राव आणि संगीतकार-दिग्दर्शक स्वानंद किरकिरे यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
चुलत बहीण झेब बंगश यांनी त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ''माझी लाडकी बहिण हानिया अस्लम आता या जगात राहिली नाही. तिला हृदयविकाराचा झटका आला आणि रात्री तिचे निधन झाले. ती फक्त ३५ वर्षांची होती.'' यासोबत तिने हानियासोबतच्या शेवटच्या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
दिग्दर्शक स्वानंद किरकिरेने याबद्दलची माहिती मिळताच सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. हानिया आणि स्वानंद यांनी एका अल्बममध्ये एकत्रित काम केले होते. याशिवाय आमिरची पत्नी किरण रावने शोक व्यक्त करताना लिहिलं आहे की, 'तुमचे संगीत आमच्या हृदयात कायम राहील.' यासोबत अनेक कलाकार आणि चाहत्यांनी शोक व्यक्त करत आहेत.