विजयादशमी हा भारतीय संस्कृतीतील केवळ सण नसून सत्याचा असत्यावर, धर्माचा अधर्मावर आणि न्यायाचा अन्यायावर विजय मिळवून देणाऱ्या विचारांचा उत्सव आहे. याच विजयाच्या आणि संघर्षाच्या संकल्पनेला आधुनिक सामाजिक वास्तवाची जोड देणारा केएनके बॉक्स प्रस्तुत ‘दशमी’ हा मराठी चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे.
विजय, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची झलक दाखवणाऱ्या ‘दशमी’च्या पहिल्या पोस्टरचे रिलीज झाले. अन्यायाविरोधात उभे राहून मिळवलेला प्रत्येक विजय म्हणजेच खरी ‘दशमी’, अशी मध्यवर्ती संकल्पना चित्रपटातून मांडण्यात आली आहे. या सिनेमात महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम, गौरी इंगवले, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर, राज कुंदन आणि दाक्षिणात्य अभिनेता रवि प्रकाश यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले की, ‘दशमी’ हा केवळ मनोरंजनासाठी बनवलेला सिनेमा नसून प्रत्येक व्यक्तीला अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे बळ देणारा विचार आहे. विशेषतः मुलींमध्ये आणि कुटुंबांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या या कथेत सत्याच्या विजयाचा प्रवास मांडण्यात आला आहे. विजयादशमीच्या पारंपरिक विचारांना आजच्या सामाजिक परिस्थितीशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
‘दशमी’मध्ये प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर भव्य दृश्यरचना आणि दर्जेदार तांत्रिक मांडणी पाहायला मिळणार आहे. कथानकाची रचना रहस्याच्या अनेक पदरांनी करण्यात आली असून सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनेक प्रश्न प्रेक्षकांसमोर उभे राहणार आहेत. अनपेक्षित वळणे आणि धक्कादायक खुलास्यांमुळे सस्पेन्स कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चित्रपटाच्या लेखनासोबतच संगीत सुरेश पंडित यांनी दिले आहे. सस्पेन्स आणि क्राईम थ्रिलरच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत वेगळा अनुभव देण्याचा ‘दशमी’चा प्रयत्न आहे.