Nana Patekar
नवी दिल्ली: बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या रोकठोक आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी नेहमीच ओळखले जातात. उत्कृष्ट अभिनय आणि सिने जगताव्यतिरिक्त नानांचे आणखी एक रूप आहे, ते म्हणजे संकटात सापडलेल्या शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे. गेल्या अनेक वर्षांपासून ते शेतकर्यांच्या हक्कासाठी आणि मदतीसाठी सतत धावून जात आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्या दिलदारपणाचा एक खास किस्सा लेखक रणबीर पुष्प यांनी सांगितला आहे.
रणबीर पुष्प यांनी १९९६ मधील 'अग्निसाक्षी' या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटात नाना पाटेकर यांच्यासोबत काम केले आहे आणि ते त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतात. नानांच्या उदारतेची आठवण सांगताना त्यांनी सांगितले की, शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी नानांनी स्वतःची दीड कोटी रुपयांची गाडी घेण्याचा बेत कसा रद्द केला होता.
रणबीर पुष्प यांनी सांगितले की, "एक दिवस नाना बातम्या पाहत होते. एका शेतकरी कुटुंबाने आत्महत्या केल्याची एक दुर्दैवी बातमी होती. विशेष म्हणजे, नाना दुसऱ्याच दिवशी १.५ कोटी रुपयांची आलिशान कार खरेदी करणार होते आणि सर्व तयारीही पूर्ण झाली होती. मात्र, ती बातमी पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मित्राला फोन केला अन् सर्व पैसे १५-१५ हजारांच्या धनादेशांच्या रूपात गरजू शेतकर्यांमध्ये वाटाण्यास सांगितले." नाना पाटेकर यांनी 'नाम फाउंडेशन'ची स्थापना करून आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांना आधार दिला.
नानांच्या रागीट आणि तापट स्वभावाचीही नेहमी चर्चा असते. अनेकदा त्यांचा संयम सुटतो. याबाबत सांगताना रणबीर पुष्प म्हणाले की, नाना तेव्हाच रागवतात जेव्हा ते स्वतः योग्य असतात. याबाबतचा एक प्रसंग सांगताना ते म्हणाले, "एकदा नानांनी स्वतःची चालती गाडी थांबवून रस्त्यावर फेकलेली एक प्लास्टिकची बाटली उचलली. त्यानंतर पुढच्या ट्रॅफिक सिग्नलवर जाऊन त्यांनी कचरा फेकणाऱ्या चालकाची गाडी थांबवली अन् ठणकावून सांगितले 'भारत स्वच्छ कोण ठेवणार? गांधीजी तर गेले. आता तुम्हीच या धरतीवर आहात, तर हे काम तुम्हालाच करावे लागेल. आता ही बाटली मी तुझ्या गाडीत फेकू का?'"
नाना पाटेकर यांच्या स्वभावातील आणखी एक पैलू म्हणजे त्यांचा स्पष्ट आणि आक्रमक अंदाज. दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्यासोबत झालेला त्यांचा वादही एकेकाळी चर्चेचा विषय ठरला होता. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जोरदार भांडण झाल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे नाना पाटेकर यांच्या ‘गरम’ स्वभावाचीही चर्चा झाली होती.