मनोरंजन

नामदेव ढसाळ यांचा झंझावात झळकणार मोठ्या पडद्यावर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित 'ढसाळ' हा बायोपिक येणार आहे. संजय पांडे निर्मित, वरुणा राणा लिखित आणि दिग्दर्शित, प्रताप गंगावणे यांच्या संवादांसह, या बायोपिकमध्ये ढसाळ यांच्या अन्याय आणि शोषणाविरुद्धच्या संघर्षाचे वास्तववादी चित्रण करण्यात येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू होऊन २०२५ मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या-

संजय पांडे म्हणाले की, ''पद्मश्री नामदेव ढसाळ म्हणजे वादळ. सोशीत आणि अन्यायाने पीडलेल्या दलित समाजाला नवसंजीवनी देणारा, शब्दात विद्रोहाची आग असलेला पँथर, महाराष्ट्राच्या साहित्याला ग्लोबल करणारा पहिला कवी. त्यांचं जीवन चरित्र म्हणजे एक ज्वलंत मशाल आहे. संपूर्ण देशात दलित पँथरने एक राजकीय व सामाजिक वादळ तयार केलं होतं. त्यांच्या जीवनावर चित्रपट करणे हे एक निर्माता म्हणून माझं सौभाग्य आहे आणि आव्हानही आहे.

लेखक आणि दिग्दर्शिका वरुणा राणा यांनी चित्रपटाचे महत्त्व व्यक्त केले. त्या म्हणाल्या, "काही गोष्टी या सांगायलाच पाहिजे. कारण त्या आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. ढसाळ यांचे जीवन ही अशीच एक कथा आहे. खेडेगावातील महारवाड्यात जन्मलेल्या, मुंबईतील कामाठीपुरा येथे बालपण गेलेल्या ढसाळांनी जागतिक पातळीवर आपल्या कवितेचा ठसा उमटविला. त्यांच्या कट्टर दलित पँथर चळवळ आणि त्यांच्या बंडखोर कवितेतून त्यांनी दलित आणि गरिबांच्या हक्कांसाठी अथक लढा दिला. ढसाळ हे व्यक्तीपेक्षा एक जास्त शक्तिशाली, प्रक्षोभक विचार होता आणि हा विचार मला आव्हानात्मक वाटला म्हणून तो तमाम लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून माझे त्याला प्राधान्य राहील. जातीच्या फिल्टर शिवाय त्यांचे विचार हे सर्व समाजाच्या अंतःकरणाला थेट भिडू शकतात कारण हे विचार कालातीत आहेत.''

नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, ''आज १५ फेब्रुवारी नामदेवचा जन्मदिवस. नामदेव यांचे समग्र कलंदरपण, विचारीपण, कवीमन आणि माणसांप्रती असलेला प्रचंड जिव्हाळा या साऱ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या ढसाळ चित्रपटातून दिसून येईल. या चित्रपटात नामदेवच नाही तर त्याच्या समग्र जीवनाबरोबरच त्यावेळची क्रांतिकारक परिस्थिती, त्यावेळचं राजकारण, पूर्ण दलित पँथरची दहशत असलेली चळवळ असं सर्वांगीण समाजाचाच लेखाजोगा उभा राहील.''

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT