मनोरंजन

Bappi Lahiri : ग्रॅमी ॲवॉर्ड जिंकण्याचे स्वप्न अखेर राहिलं अधुरं

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बप्पी लहरी (Bappi Lahiri) सारख्या संगीत तपस्वीने इहलोकीचा निरोप घेतला आहे. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडसह संगीत क्षेत्रात शोककळा परसरली आहे. या संगीतकाराच्या गितांवर ८०-९० च्या दशकातील तरुणाई बेभाण होऊन थिरकली होती. भारतीय सिनेमासह संगीतविश्वाला या गुणी कलाकारांने डिस्को संगीताचे भारतीय व्हर्जन प्रदान केले. पण या कलाकाराचे एक स्वप्न होते की, आपल्या संगीताची जागतिक पातळीवर दखल घेतली जावी. शिवाय जागतिक स्तरावरील सर्वोच्च संगीत पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी ॲवॉर्डने आपल्याला सन्मानित करण्यात यावे. ग्रॅमी ॲवॉर्ड मिळवणं हे बप्पीदा यांचे स्वप्न मात्र अखेर पर्यंत अधुरेच राहिले.

ग्रॅमी ॲवॉर्डसाठी पाच वेळा केली स्पर्धेत एन्ट्री (Bappi Lahiri)

संगीतकार बप्पी लहरी यांचे ग्रॅमी ॲवॉर्डचे प्रेम कधीही लपून राहिली नव्हते. त्यांनी अनेकवेळा माध्यमांमध्ये आपल्या या स्वप्नाबद्दल उघडपणे सांगितले होते. ते एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते, ''सोने परिधाण करणे ही माझी ओळख आहे पण, ग्रॅमी ॲवॉर्ड जिंकणे हे माझे स्वप्न आहे.'' त्यांनी ग्रॅमी ॲवॉर्ड पुरस्कारासाठी तब्बल पाच वेळा एन्ट्री दिली होती. 'इंडियन मेलोडी' या त्यांच्या अल्बमकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. या अल्बममध्ये त्यांनी भारतीय संगीत, सुफी संगीत आणि लोकसंगीताच्या शैलीतील गीते प्रस्तुत केली होती. पण, तरी देखिल त्यांच्या पासून ग्रॅमी ॲवॉर्ड दूरच राहिला.

बप्पी लहरीच्या गाण्यांची भूरळ (Bappi Lahiri)

भले ग्रॅमी ॲवॉर्ड बप्पी लहरी यांना मिळाला नाही. पण अनेक संगीत पुरस्कारांनी बप्पी लहरी यांचा सन्मान करण्यात आला आहे. भारतीय सिनेमातील डिस्को किंग अशी देखिल त्यांना उपमा दिली जायची. बॉलीवूडच्या संगीताला डिजिटल करणाऱ्या संगीतकारांमध्ये त्याचे नाव आघाडीने घेतले जाते. त्यांच्या गाण्यांना फक्त भारतातच नाही तर पाकिस्तान, अफगाणिस्तान व आखाती देशांसह हॉलिवूडमध्ये  स्थान मिळाले. त्यांचे 'कलियों का चमन' हे गाणे अमेरिकेतील टॉप ४० मधील लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यांचे संगीत आणि किशोर कुमार यांचा आवाज अशा गाण्यांनी तर अक्षरशा: धुमाकूळ घातला होता. शिवाय त्यांची अनेक गाणी आजच्याकाळात देखिल रिमेक केली गेली व ती पुन्हा गाजली.

या भारतीय कलाकारांना मिळाला ग्रॅमी ॲवॉर्ड (Bappi Lahiri)

बप्पी लहरी यांचे ग्रॅमीचे स्वप्न अखेर पर्यंत पुर्ण झाले नाही. पण काही भारतीय कलाकारांनी मात्र आपली मोहर ग्रॅमी पुरस्कारावर उमटवली आहे. आता पर्यंत पंडित रविशंकर शुक्ल, पं. विश्वमोहन भट्ट, संगीतकार ए.आर. रहमान, जाकीर हुसैन आणि जुबिन मेहता या भारतीय कलाकारांना ग्रॅमी पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.

फिल्मफेअरने सन्मानित

बप्पी लहरी यांनी ८०, ९० च्या दशकात सर्वांनाच आपल्या संगीताच्या जादूने ताल धरायला लावले होते. १९८२ मध्ये आलेल्या डिस्को डान्सर या चित्रपटातील 'जिमी जिमी आजा,' 'आय एम अ डिस्को डान्सर', कोई यहाँ नाचे नाचे', 'याद आ रहा हैं ' या गितांनी धुमाकूळ घातला होता. त्याच वर्षी आलेल्या जवानी जानेमन, रात बाकी और पग घुंघरु ही गिते देखिल खूप गाजली होती. याशिवाय १९८४ साली आलेल्या शराबी चित्रपटातील 'दे दे प्यार दे', ' थोडी सी जो पी ली है', आणि 'इंतेहाँ हो गयी' या गाण्याची दखल घेऊन त्यांना संगीतातील सर्वश्रेष्ठ फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय, डान्स डान्स, साहेब, सैलाब, थानेदार हे चित्रपट त्यांच्या संगितामुळे गाजले.

SCROLL FOR NEXT