‘मुंबई पुणे मुंबई' हा अनेकांचा आवडता सिनेमा आहे. या सिनेमाची पटकथा, कलाकार, पार्श्वसंगीत सगळ्यानेच प्रेक्षकांना मोहिनी घातली. 2010 साली रिलीज झालेला हा सिनेमा आजही आवडीने पाहिला जातो. यानंतर या सिनेमाचे 2 भाग रिलीज झाले. त्यापैकी मुंबई पुणे मुंबई 2 आणि मुंबई पुणे मुंबई 3 ला सुद्धा प्रेक्षकांनी पसंतीची पावती मिळाली. (Latest Entertainment News)
मुंबई पुणे मुंबईच्या तिसऱ्या भागात गौरी आणि गौतम यांच्या आयुष्यात नवा पाहुणा आल्यानंतर ही फ्रँचाईजी संपली असे वाटत असतानाच आता एक नवी अपडेट समोर आली आहे. या सिनेमाच्या चौथ्या भागाचे संकेत देणारा व्हिडियो समोर आला आहे
सतीश राजवाडे यांचे दिग्दर्शन लाभलेला प्रेमाची गोष्ट 2 हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमासोबतच सतीश राजवाडे यांनी चौथ्या भागाचा टीजर समोर आणला आहे. '१५ वर्षांपूर्वी सुरु झाला एक रोमँटिक प्रवास', 'नात्यांची गोडवा वाढवायला पुन्हा येतोय' या कॅप्शन देत या व्हीडियोची सुरुवात होते. याबरोबरच मागील तीन भागातील आनंदी क्षणांची आठवण करून देणारे व्हीडियोही शेयर केले आहेत. यासोबतच मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.
मुंबई पुणे मुंबई 4 या सिनेमाच्या रिलीजबाबत किंवा त्याबाबत अधिक काही समोर आले नाही. आधीच्या भागांप्रमाणेच विजय केंकरे, सविता प्रभुणे, प्रशांत दामले, मंगल केंकरे हे कलाकारही दिसण्याची शक्यता बोलली जात आहे. तिसऱ्या भागात गौरी आणि गौतमला जुळी मुले झाल्याचे दाखवले होते.