पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध चित्रपट निर्माते राम कमल मुखर्जी यांनी त्यांच्या बंगाली भव्य चित्रपटाची म्हणजे 'बिनोदिनी एकटी नाटीर उपाख्यान' ची घोषणा केली. १९ व्या शतकातील प्रसिद्ध रंगभूमी कलावंत बिनोदिनी दासी यांची मुख्य भूमिका रुक्मिणी मैत्रा साकारणार हे जाहीर केले. आता निर्मात्यांनी त्यांच्या या चित्रपटातील अन्य कलाकारांची नावे जाहीर केली आहेत. प्रतीक चक्रवर्ती आणि देव अधिकारी हे चित्रपटाची निर्मिती करत आहेत. त्यात बंगाल आणि मुंबईतील प्रतिभावान कलाकारांच्या भूमिका असणार आहेत.
निर्माते देव अधिकारी म्हणतात,"दीडशे वर्षाची परंपरा असणाऱ्या बंगाली रंगभूमीला आणि बिनोदिनी दासी यांना नम्रपणे अर्पण केलेली आमची ही आदरांजली असणार आहे. जेव्हा राम कमल यांनी या विषयाबद्दल सांगितले. तेव्हा माझ्या जाणवले की ही कथा आपण योग्य दृष्टिकोनातूनच सांगितली पाहिजे. ते या विषयावर खूप मेहनत घेत आहेत आणि त्यांच्या एखाद्या विषयात स्वतःला झोकून देऊन काम करण्याबद्दल कोणीच शंका घेऊ शकत नाही."
या चित्रपटाविषयी बोलताना प्रतीक चक्रवर्ती म्हणाले,"माझा राम कमल यांच्या दृष्टिकोणावर विश्वास आहे आणि या विषयावर गेली दोन वर्षे ते काम करत आहेत. रुक्मिणी ही बंगालमधील अत्यंत प्रतिभावान अभिनेत्री आहे आणि ते दोघेही पडद्यावर जादू निर्माण करतील, याची नक्की खात्री आहे."
देवसोबत काम करण्याबद्दल बोलताना ते म्हणाले, "देव एक सुपरस्टार आणि एक यशस्वी निर्माता देखील आहे. त्याला चित्रपट निर्मितीची सर्जनशील आणि व्यावसायिक बाजू समजते. 'बिनोदिनी ' सारख्या बहुचर्चित चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो आहोत ,याचा मला खूप आनंद होत आहे ."
बॉलिवूड अभिनेते राहुल बोस यात 'रंगाबाबू ' ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. त्यांच्या मते ही भूमिका एका उत्तुंग नायकाची आहे.
या चित्रपटाची कथा आणि पटकथा प्रियांका पोद्दार यांनी लिहिली आहे. सौमिक हलदर सिनेमॅटोग्राफीची धुरा सांभाळणार आहे. प्रसिद्ध संगीतकार जोडी सौरेंद्र आणि सौम्यजीत यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. राम कमल यांनी यातील गीते लिहिली आहेत.