मराठी चित्रपटसृष्टीत सध्या आशयघन आणि हटके विषयांवरील चित्रपटांची पर्वणी पाहायला मिळत आहे. त्यात आता रहस्य आणि थराराची सांगड घालणाऱ्या ‘मृत्यूचक्र’ या आगामी मराठी चित्रपटाची भर पडली आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, त्यातील गूढ दृश्यरचनेमुळे चित्रपटाच्या कथेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
श्री महादेव फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आणि अध्यांश मोशन पिक्चर प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटाची निर्मिती प्रणाली उन्मेश वाघमोडे यांनी केली आहे. विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडु-गंगावणे यांनी ‘मृत्यूचक्र’च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
‘प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली…’ या गूढ टॅगलाईनने मोशन पोस्टरची सुरुवात होते. पोस्टरमध्ये केंद्रस्थानी असलेलं रहस्यमय घड्याळ विशेष लक्ष वेधून घेतं. घड्याळावरील आकडे, त्याभोवतीचं काळोखाचं वातावरण आणि निर्माण केलेली भीतीची छटा पाहता चित्रपटात नेमकं कोणतं रहस्य दडलेलं आहे, याचा अंदाज बांधता येतो.
मात्र, निर्मात्यांनी कथानक किंवा प्रमुख व्यक्तिरेखांबाबत कोणताही ठोस खुलासा केलेला नाही. त्यामुळे या घड्याळाचा मृत्यूशी काय संबंध आहे, अदृश्य सावली कोणाची आहे आणि मृत्यूचं चक्र नेमकं कुणाच्या आयुष्याभोवती फिरणार आहे, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
मोशन पोस्टरमधून कथानक उघड करण्याऐवजी रहस्य अधिक गडद करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे ‘मृत्यूचक्र’च्या पडद्यामागे दडलेलं सत्य नेमकं काय, हे जाणून चित्रपट पाहावा लागणार आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची निश्चित तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. रहस्याचा धागा कुठे नेतो आणि मृत्यूचं हे चक्र कोणतं सत्य समोर आणतं, याचं उत्तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच मिळणार आहे.