

विनोद कांबळींच्या आयुष्यावर आधारित सीरीजची घोषणा झाल्यानंतर ती सिनेमा स्वरूपात का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंच्या मते, कांबळींच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे टप्पे, संघर्ष आणि विविध पैलू सविस्तरपणे मांडण्यासाठी सीरीज हे अधिक प्रभावी माध्यम ठरू शकते. त्यामुळे त्यांच्या जीवनकथेचा आवाका लक्षात घेऊन सिनेमाऐवजी सीरीजचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात काही खेळाडू असे आहेत, ज्यांच्या कारकिर्दीची सुरुवात जितकी चर्चेत राहिली, तितकाच त्यांच्या पुढचा प्रवासही कायम चर्चेचा विषय ठरला. माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचं नाव त्यापैकीच एक आहे. आता त्यांच्या आयुष्यावर आधारित कथा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मात्र, कांबळी यांच्या जीवनावर चित्रपट न बनवता थेट सीरीज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, विनोद कांबळी यांच्या आयुष्यावर आधारित या नव्या सीरीजचं दिग्दर्शन अभिजीत देशपांडे करणार आहेत. एका इंग्लिश वेबसाईटशी बोलताना देशपांडे म्हणाले, 'कांबळी' असं या सीरीजचं नाव असून, ती झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सीरीजची निर्मिती रवी भागचंदका यांच्या २०० नॉट आऊट प्रोडक्शन्स या निर्मिती संस्थेकडून केली जाणार आहे.
व्ही. शांताराम यांचा बायोपिक पोस्टपोन
दरम्यान, अभिजीत देशपांडे यांचा यापूर्वीचा महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणजे दिग्गज दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या जीवनावर आधारित बायोपिक. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि तमन्ना भाटिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, या बायोपिकचे प्रोजेक्ट काम सध्या पुढे ढकलण्यात आले आहे.
हा बायोपिक आता २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी एप्रिल महिन्यात सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शूटिंगच्या वेळापत्रकाचंही विशेष नियोजन करण्यात येत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात बाहेरील म्हणजेच आउटडोअर दृश्यांचं चित्रीकरण पूर्ण केलं जाणार आहे. त्यानंतर पावसाळ्याच्या काळात इनडोअर दृश्यांचं शूटिंग करण्याची योजना आहे. अशा पद्धतीने हवामानाचा विचार करून संपूर्ण शूटिंग शेड्यूल आखलं जात आहे.
व्ही. शांताराम यांच्या बायोपिकला विलंब झाल्यानंतर अभिजीत देशपांडे यांनी आता 'कांबळी' या नव्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित केलं आहे. विनोद कांबळी यांच्या आयुष्यावर आधारित ही कथा सीरीजच्या स्वरूपात मांडली जाणार आहे.
विनोद कांबळी यांच्या आयुष्यात क्रिकेट कारकिर्दीपासून वैयक्तिक आयुष्यापर्यंत अनेक चढ-उतार आले आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनप्रवासाची व्याप्ती लक्षात घेता, तो एका चित्रपटाऐवजी सीरीजच्या माध्यमातून मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या सीरीजमध्ये कांबळी यांच्या आयुष्यातील कोणते टप्पे आणि प्रसंग दाखवले जाणार, कलाकारांची निवड कोणाची होणार आणि ही कथा पडद्यावर नेमकी कशा पद्धतीने सादर केली जाणार, याबाबत अद्याप अधिकृत तपशील समोर आलेला नाही.
काय म्हणाले दिग्दर्शक?
मी २०१९ मध्ये 'कांबळी'चे लेखन सुरू केले. मी 'कांबळी' आणि 'व्ही. शांताराम' या दोन्ही प्रोजेक्ट्सचे लेखन एकाच वेळी सुरू केले होते. निर्माते रवी भागचंदका हे सुरुवातीपासूनच माझ्यासोबत आहेत आणि 'कांबळी'च्या कथेला आम्ही ज्या प्रकारे मांडणार आहोत, त्यातून लोकांना आश्चर्यचकित करण्याची आम्हाला आशा आहे. ही एक मानवी कथा आहे, केवळ खेळावर आधारित चित्रपट नाही.
''जेव्हा मी त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला, तेव्हा इतकी माहिती आणि इतका ड्रामा समोर आला की, ते सर्व एका चित्रपटात सामावून घेणे अशक्य होते. मला वाटते की हिंदी भाषेतील सीरीजमुळे त्यांची कथा अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.''
या शोसाठी कलाकारांची निवड
मीडिया रिपोर्टनुसार, या शोसाठी कास्टिंग अद्याप निवडण्यात आलेली नाही. परंतु निर्माते अशा नवीन चेहऱ्याच्या शोधात आहेत जो दिसायला कांबळी यांच्यासारखा असेल. निर्माते नोव्हेंबर २०२६ मध्ये शूटिंग सुरू करण्याचे नियोजन करत आहेत.