मनोरंजन

दिलीप प्रभावळकर यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विठ्ठल उमप फाऊंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या मानाच्या 'मृदगंध पुरस्कारा'ची घोषणा नुकतीच पत्रकार परिषदेत फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश विठ्ठल उमप यांनी केली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा 'मृदगंध जीवनगौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. यंदाचा १३ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा 'मृदगंध पुरस्कार' वितरणाचा भव्य सोहळा येत्या २६ नोव्हेंबरला काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे सायंकाळी ६ वा संपन्न होणार आहे. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना 'मृदगंध पुरस्कार' देण्यात येतो.

सुदेश भोसले (संगीत विभाग), आतांबर शिरढोणकर (लोकसंगीत), अनुराधा भोसले (सामाजिक कार्य), सुमित राघवन (अभिनय क्षेत्र), चिन्मयी सुमित (अभिनय क्षेत्र), केतकी माटेगावकर (नवोन्मेष) या मान्यवरांना ही या सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, भाजपचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा 'आयुष्यावर बोलू काही' हा कवितांचा विशेष कार्यक्रम या सोहळ्यात संपन्न होणार असून शाहीर बापू जाधव यांच्या लोककला शाहिरीचा तसेच खुशाबा यांच्या आदिवासी नृत्याचा आस्वादही रसिकांना या सोहळ्यादरम्यान घेता येईल.

बाबांनी लोककलेसाठी आपलं आयुष्य वेचलं. जेव्हा ते रंगमंचावर उभे राहायचे तेव्हा एक 'चैतन्य' संचारायचं. याच 'चैतन्या'चा शोध घेत विविध क्षेत्रात आपलं बहुमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे गायक नंदेश उमप यांनी यावेळी सांगितले. या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा समीरा गुजर जोशी सांभाळणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT