Mohanlal on L2: Empuraan Pudhari
मनोरंजन

'एम्पुरान'मधून गुजरात दंगलीचे संदर्भ वगळणार; अभिनेता मोहनलाल यांची दिलगिरी

Mohanlal on L2Empuraan: केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन

Akshay Nirmale

पुढारी ऑनलाईन डेस्क: मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांचा 'L2: एम्पुरान' चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील सन 2002 च्या गुजरात दंगलीच्या संदर्भानंतर चित्रपटाबाबत वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता मोहनलाल यांनीच या चित्रपटातील गुजरात दंगलीचे संदर्भ वगळणार असल्याचे सांगितले.

दंगलीच्या उल्लेखांबाबत दिलगिरी व्यक्त करत या प्रकरणी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभुमीवर रविवारी सोशल मीडियातून एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. (Mohanlal on 2002 Gujrat Riot refference in L2Empuran)

काय म्हणाले मोहनलाल?

मोहनलाल यांनी सोशल मीडियावरील निवेदनात म्हटले आहे की, "एम्पुरान या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये काही राजकीय आणि सामाजिक विषयांचा समावेश करण्यात आला होता. ते माझ्या अनेक चाहत्यांना आवडले नाही.

एक कलाकार म्हणून, माझ्या कोणत्याही चित्रपटातून कोणत्याही राजकीय चळवळीला, विचारसरणीला किंवा धार्मिक गटाला दुःखावले जाणार नाही, याची जबाबदारी माझी आहे.

त्यामुळे मी आणि एम्पुरान टीम हे मान्य करतो की, या वादासाठी सर्वस्वी आम्ही जबाबदार आहोत. त्यामुळे आम्ही या चित्रपटातील असे संदर्भ पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या चार दशकांपासून मी तुमच्यातील एक म्हणून चित्रपटसृष्टीत काम करत आहे.

तुमचे प्रेम आणि विश्वास हेच माझे खरे बळ आहे. त्यापेक्षा मोठा असा कोणताही ‘मोहनलाल’ असू शकत नाही... सप्रेम, मोहनलाल, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

केरळच्या मुख्यमंत्र्यांचा चित्रपटाला पाठिंबा

दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. त्यांनी एम्पुरान टीमच्या पाठीशी उभे राहत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन केले आहे.

"लोकशाही समाजात नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण झाले पाहिजे. कला आणि कलाकारांना नष्ट करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या हिंसक धमक्या या फॅसिस्ट प्रवृत्तीचे लक्षण आहे. अशा धमक्या लोकशाही अधिकारांचे उल्लंघन आहेत.

चित्रपट बनवणे, ते पाहणे, त्यांचा आनंद घेणे, त्यांचे मूल्यमापन करणे, त्यावर सहमत असणे किंवा असहमत राहणे हे हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाहीत.

देशातील लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष मुल्यांवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाने यासाठी एकत्र आवाज उठवायला हवा," असे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी निवेदनात म्हटले आहे.

'ल्युसिफर'चा रीमेक

पृथ्वीराज, अभिमन्यू सिंग आणि मंजू वारियर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यानेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट मोहनलाल यांच्या गाजलेल्या 'ल्युसिफर' या चित्रपटाचा सीक्वेल आहे.

चित्रपट 27 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून चित्रपटाने केरळमध्ये प्रदर्शनानंतर बंपर ओपनिंग मिळवली आहे. चित्रपटाने 100 करोड क्लबमध्ये एंट्री केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT