मॉडेल ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात न्यायालयाने तिच्या पतीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. तपास यंत्रणांनी सादर केलेल्या प्राथमिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हा निर्णय दिल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर पोलिस तपास अधिक वेगाने होण्याची शक्यता असून प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.
भोपाळ : ३३ वर्षीय आणि मॉडेल अभिनेत्री ट्विशा शर्माच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी सोमवारी भोपाळच्या स्थानिक न्यायालयाने तिचा फरार पती आणि वकील समर्थ सिंग याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयीन निर्णयानंतर भोपाळ पोलिसांनी समर्थची माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.
ट्विशाचा विवाह डिसेंबर २०२५ मध्ये समर्थशी झाला होता. १२ मे रोजी भोपाळमधील कटारा हिल्स येथील घरात ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. द्विशाच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, लग्नानंतर हुंड्यासाठी तिचा पद्धतशीरपणे मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. छळामुळे तिचे वजन १५ किलोने घटले होते. ती गरोदर असताना पतीने मुलाचा स्वीकार करण्यास नकार दिला होता, असा दावाही चुलत बहिणीने केला आहे.
ड्रग्जचे आरोप आणि कुटुंबाचा आक्षेप सुनावणीदरम्यान समर्थच्या वकिलांनी द्विशाच्या मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ती ड्रग्जच्या आहारी गेल्याचा दावा केला. मात्र, सरकारी वकिलांनी हा दावा फेटाळून लावत पुरावे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली. सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश पल्लवी द्विवेदी यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर समर्थचा जामीन फेटाळला. या प्रकरणात समर्थची आई आणि निवृत्त न्यायाधीश गिरीवाला सिंग यांना आधीच जामीन मिळाला आहे.
तपासावर प्रश्नचिन्ह आणि कुटुंबीयांचे आंदोलन
विशेष तपास पथकाचे प्रमुख एसीपी रजनीश कश्यप यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालात प्राथमिकदृष्ट्या आत्महत्या म्हटले असले, तरी शरीरावरील जखमांमुळे कुटुंबीय याला खून म्हणत आहेत. तपासात गंभीर चूक झाल्याचे मान्य करत त्यांनी सांगितले की, तपास अधिकाऱ्याने गळफास घेतलेली दोरी एम्सकडे पाठवली नव्हती, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल.
ट्विशाचे वडील नवनिधी शर्मा यांनी या तपासावर अविश्वास दाखवला असून, एम्स येथे पुन्हा शवविच्छेदन करण्याची आणि या प्रकरणाचा तपास मध्य प्रदेशबाहेर वर्ग करण्याची मागणी केली आहे. रविवारी कुटुंबीयांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलनही केले.