Jennifer Barreto Miss Universe 2026 
मनोरंजन

Jennifer Barreto Miss Universe 2026 : कोण आहे नवी ‘मिस युनिव्हर्स’ जेनिफर बॅरेटो? जिच्या AI वरील उत्तराने संपूर्ण जग झाले थक्क

Miss Universe Controversy : सौंदर्य, आत्मविश्वास अन् बुद्धिमत्तेचा संगम! : AI कितीही प्रगत झाले तरी... जेनिफरच्या उत्तराने परीक्षक भारावले

रणजित गायकवाड

सॅन जुआन (पोर्तो रिको) : सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वासाचा अनोखा संगम असलेल्या 'मिस युनिव्हर्स २०२६' स्पर्धेचा अंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यंदाच्या स्पर्धेचा मानाचा मुकुट यजमान पोर्तो रिकोच्या जेनिफर बॅरेटो हिने पटकावला. घरच्या मैदानावर हजारो प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात तिने मिळवलेला हा विजय पोर्तो रिकोसाठी अभिमानाचा क्षण ठरला. मात्र, जेनिफरच्या विजयाची खरी चर्चा तिच्या सौंदर्यापेक्षा अंतिम फेरीत तिने दिलेल्या एका विचारप्रवर्तक उत्तरामुळे अधिक रंगली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या प्रभावाच्या काळात माणसाने कोणती मूल्ये जपली पाहिजेत, या प्रश्नावर तिने मांडलेले विचार परीक्षकांच्या पसंतीस उतरले.

सौंदर्याच्या पलीकडे बुद्धिमत्तेचीही कसोटी!

मिस युनिव्हर्स २०२६ च्या अंतिम सोहळ्यात सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली. प्राथमिक फेऱ्यांमधील कामगिरीच्या आधारे स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्यानंतर टॉप-३० स्पर्धकांमध्ये स्विमवेअर राउंड रंगला. या फेरीतील कामगिरीच्या जोरावर १२ सौंदर्यवतींनी इव्हिनिंग गाऊन राउंडमध्ये प्रवेश मिळवला. आकर्षक वेशभूषा, आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि मंचावरील वावर यामुळे या फेरीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

यानंतर अंतिम पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली. मात्र, इथून पुढे स्पर्धेचे स्वरूप केवळ सौंदर्यप्रदर्शनापुरते मर्यादित राहिले नाही. सामाजिक जाणीव, वैचारिक प्रगल्भता, नेतृत्वक्षमता आणि समकालीन प्रश्नांवरील भूमिका यांचीही कसोटी लागली. मिस युनिव्हर्स स्पर्धेची आजच्या काळातील उपयुक्तता काय आहे, तसेच जगाला आजच्या नेत्यांकडून नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत, अशा प्रश्नांनी अंतिम फेरी अधिक रंगतदार झाली.

AI च्या युगात मानवी मूल्ये कोणती जपणार? जेनिफरचे उत्तर चर्चेत!

अंतिम फेरीत जेनिफर बॅरेटो हिला विचारण्यात आलेला प्रश्न विशेष लक्षवेधी ठरला. प्रश्न होता, 'कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभाव जगभर वाढत असताना माणसाने कोणते मानवी मूल्य कधीही गमावता कामा नये?'

या प्रश्नाचे उत्तर देताना जेनिफरने इंग्रजीऐवजी आपल्या मातृभाषेत स्पॅनिशमधून विचार मांडले. तिने तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावाला विरोध करण्याऐवजी त्याचा जबाबदारीने वापर करण्याची गरज अधोरेखित केली.

ती म्हणाली, 'तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करणे ही काळाची गरज आहे. जर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आपली मूल्ये धोक्यात येत असतील, तर ती मुळात आपली खरी मूल्ये नव्हतीच. आपण जे बोलतो आणि प्रत्यक्ष कृतीत जे उतरवतो, त्यातील सातत्य म्हणजेच खरी मूल्ये. विशेषतः जेव्हा ही मूल्ये जपणे कठीण असते, तेव्हाच त्यांची खरी परीक्षा होते.'

जेनिफरच्या या उत्तरातून तंत्रज्ञान आणि मानवी मूल्ये यांच्यातील समतोलाचा महत्त्वपूर्ण संदेश समोर आला. AI माणसाच्या आयुष्यात कितीही प्रभावी ठरले, तरी प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि तत्त्वनिष्ठा यांना पर्याय असू शकत नाही, असा आशय तिच्या उत्तरातून व्यक्त झाला. तिच्या या विचारांनी अंतिम फेरीला केवळ सौंदर्यस्पर्धेपुरते मर्यादित न ठेवता एक वैचारिक परिमाण दिले.

वादांच्या सावटानंतर स्पर्धेची दिमाखदार सांगता

गेल्या वर्षभरात मिस युनिव्हर्स स्पर्धा विविध वाद आणि चर्चांमुळे सातत्याने चर्चेत राहिली होती. स्पर्धेच्या आयोजनापासून ते इतर काही घडामोडींपर्यंत अनेक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे यंदाच्या अंतिम सोहळ्याकडे विशेष लक्ष लागले होते.

मात्र, अंतिम सोहळ्यातील रंगतदार फेऱ्या, स्पर्धकांचा आत्मविश्वास आणि अंतिम प्रश्नोत्तरांच्या सत्राने कार्यक्रमाला वेगळी उंची मिळाली. अखेर यजमान पोर्तो रिकोच्या जेनिफर बॅरेटोच्या डोक्यावर मिस युनिव्हर्सचा मुकुट विराजमान झाला आणि घरच्या प्रेक्षकांनी जल्लोषात तिच्या विजयाचे स्वागत केले.

यंदाच्या स्पर्धेने एक गोष्ट अधोरेखित केली. सौंदर्यस्पर्धांमध्ये आता केवळ बाह्य सौंदर्य नव्हे, तर विचारांची स्पष्टता, सामाजिक भान आणि बदलत्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही महत्त्वाचा ठरत आहे. AI च्या युगात मानवी मूल्यांची आठवण करून देणारे जेनिफरचे उत्तर त्यामुळेच या स्पर्धेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT